जगातल्या 'या' पाच देशांच्या प्रमुखांची हत्या होणार? भीतीपोटी काहीजण भूमिगत तर काही देश सोडून पळाले!

19 Jul 2025 12:10:14

नवी दिल्ली : नुकतेच इराण-इस्त्रायलने युद्धबंदी करारावर सहमती दर्शवल्याने त्यांच्यातील संघर्ष संपत नाही तोवर इस्रायलने सीरियावर हल्ले केल्याची बातमी समोर आली. इस्रायलकडून युद्धाचा इशारा मिळताच जीवाच्या भीतीने सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा आणि संरक्षण मंत्री त्यांच्या कुटुंबियांसह दमास्कसमधून पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, ते असे एकमेव राष्ट्रप्रमुख नाहीत ज्यांच्या जीवाला धोका आहे. जगातील पाच देशांच्या प्रमुखांची हत्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इस्रायलने आता इराणपाठोपाठ सीरियाकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, एकट्या सीरियाच्या राष्ट्रप्रमुखांनाच नाही जगातील तैवान, इराण, येमेन आणि आर्मेनिया या देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर मृत्यूची तलवार टांगती आहे. या देशांच्या प्रमुखांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर निर्बंध लादले आहेत.

१) अहमद अल शरा, सीरिया

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा यांनी इस्रायलने केलेल्या हल्ल्यापासून जीवाचा धोका सतावत आहे. वास्तविक सीरियाच्या स्वेदा शहरात भडकलेल्या हिंसेत बळी ठरलेल्या ड्रुज गटामुळे इस्रायल संतापला आहे. एक दिवसपूर्वीच इस्रायलने दमास्कसमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाजवळ ड्रोन डागून सावधानतेचा इशारा दिला होता. याशिवाय इस्रायलची गुप्तचर संस्था मोसाद टार्गेट किलींगमध्ये प्रसिद्ध आहे. इराणविरुद्धच्या संघर्षात संपूर्ण जगाने याची झलक पाहिली आहे. अशात सीरियातही राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा यांना इस्रायलच्या आडून कोणी विरोधक किंवा शत्रू आपल्याला संपवतील, ही भीती सतावत आहे. त्यामुळे ते देश सोडून पसार झाल्याचे म्हटले जात आहेत.

२) लाई चिंग ते, तैवान

तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग ते यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. त्यांनाही चीनकडून अनेकवेळा धमकी मिळाली आहे. त्यांच्यावर चीनी धोरणाची अवहेलना केल्याचा आरोप आहे. चीनी सैन्य आणि गुप्तचर संघटना त्यांच्या विरोधात कट रचत असल्याचा संशय आहे. याशिवाय लाई चिंग यांना तैवानमधील चीनी समर्थकांकडूनही धोका आहे.

३) अली खामेनेई, इराण

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांना तर इस्रायलकडून धोका असल्याचे जगजाहीर आहे.अलिकडे सशस्त्र संघर्षादरम्यान इस्रायलने इराणच्या अनेक वरिष्ठ कमांडरचा खात्मा केला. त्यानंतर खामेनेई यांना जीवाच्या रक्षणासाठी अनेक दिवस भूमिगत व्हावे लागले. कठोर धार्मिक शासन, जनतेतील रोष याचाही त्यांना धोका आहे. इस्रायलच्या मोसादशिवाय मुजाहिदीन-ए-खल्क सारख्या विरोधी गटांकडूनही त्यांना धोका आहे.

४) रशाद अल-अलीमी, येमेन

येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशद अल अमीनी यांना हुथी बंडखोरांकडून सर्वाधिक धोका आहे. देश अस्थिर असल्याने येमेनच्या अनेक भागांवर हुथींचा गट संघटित झाला आहे. याआधीही हुतींनी अनेक राजकीय नेत्यांची हत्या केली आहे. त्यामुळे ते येमेनप्रमुखांना ठार करु शकतात. येमेनमध्ये सातत्याने होणारे हल्ले आणि सत्ता संघर्षाने येथील स्थिती बिकट आहे. मध्य पूर्वेत ज्याप्रकारची स्थिती आहे. येमेनचे हुथी ज्याप्रकारे इस्रायल आणि अमेरिकेला लक्ष्य करीत आहेत. त्या दोन्ही देशांकडूनही येमेनचे राष्ट्राध्यक्ष रशद अल अलीमी यांना धोका आहे. मात्र दोन्ही देशांनी अद्याप तरी त्यांना धमकी दिलेली नाही.

५) निकोल पशिन्यान, आर्मेनिया

आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांच्या जीवाला देखील धोका आहे. नागोर्नो-काराबाख युद्धात हार आणि रशियांशी बिनसल्याने त्यांच्या हत्येची त्यांना भिती सतावत आहे. निकोल यांना प्रामुख्याने अंतर्गत विरोध आणि आर्मिनियन तसेच सैन्यातील गटाकडून धोका आहे. याआधी २०२१ मध्ये त्यांच्यावर हल्ला होणार होता, त्यातून ते वाचले. त्यांच्या राजीनाम्याची अनेकदा मागणी झाली आहे.





Powered By Sangraha 9.0