ठाणे : कोपरी येथे वर्षानुवर्षे मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आगरी-कोळी महिलांचे प्रशस्त मच्छी मार्केटचे स्वप्न साकार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केल्यामुळे एकमजली वातानुकूलित मार्केट उभारले जाईल. या कामाचे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून आज भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.
महापालिकेचे कोपरी येथील जुने मार्केट मोडकळीला आले होते. त्यामुळे पारंपरिक दृष्टीने अनेक वर्षांपासून मासेविक्री करणाऱ्या महिलांना ऊन-पावसाचा तडाखा सोसत मासे विक्री करावी लागत होती. त्यात वृद्ध महिलांचे प्रमाण मोठे होते. ते ध्यानात घेऊन भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडून महापालिकेकडे मच्छी मार्केटची इमारत उभारण्यासाठी पाठपुरावा केला जात होता. मात्र, त्याला महापालिकेकडून निधी मिळत नव्हता. भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्या मागणीनुसार अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष निधीतून अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार मच्छी मार्केटचे भूमिपूजन खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते आज उत्साहात करण्यात आले. त्यावेळी आगरी-कोळी महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कोपरी येथील नियोजित मार्केट एक मजली असून, तेथे लिफ्ट बसविली जाणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण मार्केट वातानुकूलित ठेवले जाणार असल्यामुळे वयोवृद्ध महिलांना पहिल्या मजल्यावर लिफ्टने मच्छीची टोपली नेता येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष निधी मंजूर केल्यामुळे मार्केट साकारणार आहे, याबद्दल भरत चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. तसेच या कामासाठी तांत्रिक मुद्दे दूर करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांचेही योगदान महत्वाचे ठरले, असे भरत चव्हाण यांनी सांगितले.