छांगुरबाबाचे कृत्य इस्लामविरोधीच; फतवा जारी!

19 Jul 2025 16:53:48

मुंबई : उत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये बेकायदेशीर धर्मांतराच्या आरोपाखाली जलालुद्दीन उर्फ छंगूरबाबा यास नुकतीच अटक करण्यात आली. लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करणे, हिंदू मुलींचे मुस्लिम मुलांसोबत लग्न लावणे आणि दबाव निर्माण करण्यासाठी तरुणांच्या गटाचा वापर करणे असे त्याच्याविरोधात गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी अखिल भारतीय मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी छांगुरबाबा विरोधात फतवा जारी केला आहे. ज्यामध्ये छांगुरबाबाच्या कृती बेकायदेशीर आणि इस्लाम मधील तत्त्वांच्या विरुद्ध असल्याचे म्हटले आहे.

मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी फतव्यात म्हटले आहे की, इस्लाम हा शांतताप्रिय असून यात जबरदस्ती किंवा दबावाला वाव नाही. पैगंबरांनी सुद्धा कधीही कोणत्याही हिंदूंना लोभ किंवा दबाव देऊन इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले नाही. त्यांच्या चरित्रात असे कोणतेही उदाहरण आढळत नाही. त्यांना सर्वधर्मियांना समान वागणूक दिली.

पुढे ते म्हणाले, मुस्लिमांव्यतिरिक्त इतरांच्या जीविताचे, मालमत्तेचे आणि सन्मानाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इस्लामचा उपदेशक त्याच्या धर्माचे गुण स्पष्ट करू शकतो, परंतु हिंदुंवर जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर करण्यासाठी दबाव आणणे पूर्णपणे चुकीचे आहे. छांगुरबाबाने केवळ कायद्याचे उल्लंघन केले नाही तर इस्लामच्या मूलभूत तत्त्वांनाही धक्का पोहोचवला आहे. अशा पापी आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची खरी आवश्यकता आहे. छंगूरचे कृत्य केवळ बेकायदेशीरच नाही तर इस्लामच्या विरोधातही आहे आणि म्हणूनच मुस्लिम समुदायाने त्याच्या कारवायांपासून दूर राहावे.

Powered By Sangraha 9.0