कर्जत: सेवा सहयोग फाउंडेशन आणि सन्मित्र बुक बँक प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथील अभिनव ज्ञानमंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांसाठी ’बुक बँक उपक्रम’ राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत इयत्ता अकरावी ते तृतीय वर्ष पर्यंतच्या २८ विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक पुस्तके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव नंदकुमार मणेर, मुख्याध्यापक शिंदे, उपमुखाध्यापिका दाभाडे मॅडम, तसेच बुक बँक प्रकल्पाचे असिस्टंट मॅनेजर जितेंद्र कामळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जितेंद्र कामळी यांनी सेवा सहयोग फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती देत बुक बँक प्रकल्पाच्या उद्देशांबद्दल सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, शिक्षणाचा आर्थिक अडचणींमुळे अडथळा होऊ नये, म्हणूनच ही संकल्पना राबवली जाते.मुख्याध्यापक शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रामाणिकपणा, चिकाटी आणि कष्टाचे मूल्य समजावले. श्री. मणेर सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, संधी मिळाली आहे ती दवडू नका. यशस्वी भविष्यासाठी हीच पायरी आहे.
कार्यक्रमात बुक बँकेद्वारे पुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांचे समाधान आणि त्यांच्या चेहर्यावरील आनंद हा या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत होता. उपस्थित मान्यवरांनी पुढील काळात आणखी विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. या उपक्रमात प्रमुख अतिथींशिवाय सेवा सहयोग फाउंडेशनचे कार्यकर्ते, अभ्यासिकेचे प्रमुख शिक्षकवृंद आणि अनेक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ दान’ या तत्त्वावर आधारलेला हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी खरंच एक आशेचा किरण ठरतो आहे.