गुरुपौर्णिमेनिमित्त साताऱ्यात वीरशैव लिंगायत समाजाचा विराट मेळावा अस्मिता, अध्यात्म आणि सांस्कृतिक जागृतीचा संगम

    19-Jul-2025
Total Views |


सातारा, वीरशैव लिंगायत समाजाच्या आध्यात्मिक परंपरा, सांस्कृतिक ठसा आणि तत्त्वज्ञानाचा जागर करणारा भव्य समाजमेळावा २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता साताऱ्यात आयोजित करण्यात आला आहे. हिंदू वीरशैव लिंगायत मंच सातारा वतीने समर्थ मंदिरातील दैवज्ञ सांस्कृतिक भवन येथे हा विशेष कार्यक्रम गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने होणार आहे.

लिंगधारी परंपरेचे आध्यात्मिक अधिष्ठान, शिवतत्त्वावरील निष्ठा आणि बसवेश्वरांच्या समतेच्या विचारांना वाहिलेला समाज विविध चुकीच्या आक्षेपांना सामोरे जात असतानाच, आपली अस्मिता, श्रद्धा आणि स्वाभिमान जागवण्यासाठी एकत्र येत आहे. 'वीरशैव म्हणजे वेगळा धर्म नव्हे तर हिंदू धर्मातील एक प्रभावी संप्रदाय' या धारणा स्पष्टपणे मांडणारा हा मेळावा भावनिक आणि वैचारिकदृष्ट्या ऐतिहासिक ठरणार आहे.

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉ. महादेव शिवाचार्य महाराज यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. तसेच प्राचार्य गजानन घरणे, हेमंत हरहरे आणि विविध ठिकाणांहून आलेले मान्यवर विचारप्रवर्तक समाजबांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण करणार आहेत.
कार्यक्रमानंतर महाआरती, सामूहिक प्रार्थना व बसववाणीचे सामूहिक पठण करण्यात येणार आहे.

धर्म, आचार, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मता या चारही पायांवर उभा असलेला वीरशैव लिंगायत समाज आजही शोषणविरोधी आणि विवेकाधिष्ठित लढ्याचा प्रतिनिधी आहे, याची जाणीव या मेळाव्यातून पुनः एकदा होणार आहे. समाजाच्या अस्मितेला धार आणि दिशा देणारा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार असून, सर्व बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.