रोहित पवारांची पोलिसांवर दादागिरी; आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवली

18 Jul 2025 17:56:13
 
rohit-pawars-bullying-of-the-police
 
 
मुंबई : विधानभवनात गुरुवारी झालेल्या राड्याचे पडसाद रात्री उशिरापर्यंत उमटले. आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित पवार पोलिसांवर दादागिरी करत असल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला.
 
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरुवार, १७ जुलै रोजी आ. गोपीचंद पडळकर आणि आ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात हाणामारी झाली. या घटनेनंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला. जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, पोलिस त्यांना घेऊन जात असताना आव्हाड यांनी पोलिसांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आमदार रोहित पवारसुद्धा त्यांच्यासोबत होते. नितीन देशमुख यांना अटक केल्यानंतर हे दोन्ही नेते चांगलेच संतापले. यावेळी आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवली आणि निषेध करण्यास सुरुवात केली.
 
नितीन देशमुख यांना कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये नेले याची माहिती घेण्यासाठी आमदार रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी ते पोलिसांना दमदाटी करत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. "हात वर करून बोलू नका, आवाज खाली करा. नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. आमदारवर आवाज उचलायचा नाही, असे ते पोलिसांना बजावताना दिसतात. यावेळी रोहित पवार चांगलेच संतापले होते. हा वाद सुरू असताना एका पोलिसाने हस्तक्षेप करत हा वाद थांबवला.
 
 
Powered By Sangraha 9.0