मुंबई: राज्यात मराठी भाषेच्या अस्तित्वावरून निर्माण झालेल्या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा रोड येथे आज दि. १८ जुलैला सभा होणार आहे. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मीरा रोड येथे झालेल्या राड्यानंतर प्रथमच राज ठाकरे मीरा रोड दौऱ्यावर येत आहेत. ज्या ठिकाणी राडा झाला त्याच ठिकाणी राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. सभे दरम्यान राज ठाकरे मीरा रोड येथील मराठी भाषिकांना संबोधित करणार आहेत.
मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी ज्या परप्रांतीय भाषिक असलेल्या दुकानदाराला मारहाण केली होती त्या दुकानापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही सभा पार पडत आहे. मराठी अमराठी मुद्दा हा राज ठाकरे यांच्या सभेतील मुख्य मुद्दा आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मीरा रोड येथील नवीन शाखेचे उद्घाटनसुद्धा राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून या सभेसाठी दोन दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मीरा रोडच्या नित्यानंद नगर येथे ही सभा होत आहे. राज ठाकरे यांच्या नियोजित सभेमुळे सभास्थळापासून जवळच असलेल्या सेंट पॉल शाळेला हायस्कुल प्रशासनाने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, भाषेच्या वादातून झालेल्या राड्यानंतर प्रथमच राज ठाकरे मीरा रोड दौऱ्यावर येत असल्याने स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साह निर्माण झाला आहे.