मुंबई, मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेच्या सर्व डब्यांना मेट्रोप्रमाणे स्वयंचलित दरवाजे आणि वातानुकूलन (एसी) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी तिकीट दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्पात कोणालाही बेघर केले जाणार नाही, अशी ग्वाही देताना त्यांनी मुंबईच्या विकासाबाबत सरकारची भक्कम भूमिका मांडली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले, की लोकल रेल्वेच्या डब्यांमध्ये दरवाजे नसल्याने वारंवार अपघात होतात. यासंदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली होती, की लोकल रेल्वेचे डबे मेट्रोप्रमाणे वातानुकूलित आणि स्वयंचलित दरवाजे असलेले असावेत. "मला आनंद आहे की, रेल्वेमंत्री आज मुंबईत होते आणि त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. लवकरच ते यासंदर्भात घोषणा करतील. नव्याने तयार होणारे सर्व लोकल डबे एसी असतील आणि सर्वसामान्य मुंबईकरांना कोणतीही दरवाढ न करता ही सुविधा मिळेल," असे फडणवीस म्हणाले.
मुंबईच्या विकासासाठी सरकार अनेक प्रकल्प राबवत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. वांद्रे-वर्सोवा कोस्टल रोडचे काम सुरू आहे, तर दहिसर ते भाईंदर मार्गिकेचे कार्यादेश देण्यात आले आहेत. याशिवाय, उत्तनपासून विरारपर्यंत सागरी सेतू प्रकल्प प्रस्तावित आहे. यामुळे विरार ते कुलाबा असा सलग सेतू निर्माण होईल. सांताक्रुझ-चेंबूर पूर्व-पश्चिम फ्री-वे (६.४५ किमी), ऑरेंज गेट ते मरिन लाईन्स बोगदा, ठाणे-बोरीवली ट्वीन टनेल आणि विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. मुंबईत ३३० किमी लांबीचे मेट्रो प्रकल्पही हाती घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
एकात्मिक तिकीट प्रणाली यशस्वीमुंबईतील मेट्रो, लोकल, मोनो, बस आणि जलवाहतुकीसाठी एकाच व्यासपीठावर तिकीट उपलब्ध करून देणारी एकात्मिक तिकीट प्रणालीची चाचणी यशस्वी झाली आहे. "ही तिकिटे व्हॉट्सअँपवर उपलब्ध होतील, ज्यामुळे प्रवाशांना सुविधा मिळेल," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
एकही धारावीकर बेघर होणार नाहीधारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "धारावीची जमीन अदानींना दिलेली नाही, ती धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट (डीआरपी) या सरकारी संस्थेला देण्यात आली आहे. अदानी फक्त विकासक आहेत. १०८ हेक्टर क्षेत्रात हा प्रकल्प राबवला जाईल. पात्र लाभार्थ्यांचे पुनर्वसन धारावीतच होईल, तर उद्योजकांना त्याच ठिकाणी जागा दिली जाईल. अपात्र ठरलेल्यांना १२ वर्षे भाडेतत्वावर घर दिले जाईल, त्यानंतर ते घर त्यांच्या नावावर होईल." या प्रकल्पासाठी ९० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले असून, स्थानिकांनी याला समर्थन दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोणाचाही बाप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीमुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना फडणवीस यांनी ठणकावून उत्तर दिले. "मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील. कुणाचा बाप, बापाचा बाप किंवा त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राचीच राहील. मराठी माणसाचा आवाज येथे बुलंद राहील," अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली. अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईवरील कवितेचा उल्लेख करत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून दिली.
नाना पटोलेंचा बॉम्ब फुटलाच नाहीहनी ट्रॅपच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "हनी ट्रॅपबाबत कोणतीही तक्रार किंवा पुरावा समोर आलेला नाही. तरीही या मुद्द्यावर माहौल तयार केला जात आहे. कोणताही मंत्री यात अडकलेला नाही. नाना पटोलेंनी बॉम्बचा उल्लेख केला. पण, आमच्यापर्यंत कोणताही बॉम्ब आलेला नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.