मानखुर्द पुनर्वसन प्रकल्पात १६० अपात्र झोपडपट्टीधारकांची शासनाकडून कबुली

18 Jul 2025 21:11:13

मुंबई : मानखुर्द पश्चिम ते चिता कॅम्प ट्रॉम्बे या भागात नाला रुंदीकरणाच्या कामाच्या अनुषंगाने राबवण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एकूण ११७९ पात्र लाभार्थ्यांमध्ये ४४१ बोगस झोपडपट्टीधारकांचा समावेश करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी अंधेरी विधानसभेचे आमदार अमित साटम यांनी विधानसभेत सरकारकडे थेट प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सभागृहात विचारले की, या प्रकल्पातील “परिशिष्ट दोन” मधील लाभार्थ्यांची येत्या ३० दिवसांत चौकशी केली जाईल का, चौकशीत बोगस लाभार्थी आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल का आणि या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल का. या प्रश्नांना उत्तर देताना राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सदर परिशिष्ट दोन रद्द करण्यात आल्याचे सांगितले असून सध्या चौकशी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तसेच, शासनाने १६० अपात्र झोपडपट्टीधारक असल्याची कबुली दिली आहे. उर्वरित प्रकरणांची चौकशी सुरू असून अहवालानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजीनगर-मानखुर्द आणि अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघांमध्ये महापालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमधील लाभार्थ्यांच्या पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.



Powered By Sangraha 9.0