महाराष्ट्रात व्हर्टीपोर्ट्सचा विकास करण्यासाठी समिती , एअर टॅक्सी सेवेसाठी उभारण्यात येणार व्हर्टीपोर्ट्स , महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात व्हर्टीपोर्ट उभारणीसाठी व्यवहार्यता तपासणार

18 Jul 2025 21:54:42

मुंबई, देशात केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत हवाई वाहतूक प्रगत व सुलभ करण्यासाठी व्हर्टीपोर्टस्चा विकास हा एक अपरिहार्य उपक्रम हाती घेण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकाराला केंद्र शासनाशी समन्वय करण्यासाठी एक समन्वयक नियुक्त करण्याबाबतकळविले होते. त्यानुसार राज्य सरकराने व्हर्टीपोर्टचा विकास करण्यासाठी स्थानिक समितीची स्थापन केली आहे.

सामान्य प्रशासन विभाग अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या या समितीत अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, नगर विकास विभाग, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मुंबई आणि संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी / महानगरपालिका आयुक्त हे सदस्य असतील.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हर्टीपोर्टस्च्या अंमलबजावणीसाठी साइट ओळख, तांत्रिक-आर्थिक मूल्यांकन, नियामक मंजुरी आणि एकूण प्रकल्प अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग आणि भागधारकांशी समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला नोडल एजन्सी (समन्वयक) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. व्हर्टीपोर्टसच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या नागरी विमानन महासंचालनालय (DGCA) यांनी केलेल्या मार्गदर्शक सूचना तसेच केंद्र शासनाने वेळेवेळी विहीत केलेल्या नियमांचे पालन करावे, असे निर्देश राज्य सरकराने या समितीला दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0