रायपूर : (Bhupesh Baghel's Son Arrested) छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या मुलाला मद्य घोटाळा प्रकरणात शुक्रवारी १८ जुलैला ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या अटकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पाच दिवसांची ईडी कोठडी
ईडी अधिका-यांनी पहाटे टाकलेल्या छाप्यानंतर चैतन्य बघेल यांना भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेण्यात आले आहे. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. नंतर त्याला रायपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले आणि पाच दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवण्यात आले.
नेमकं प्रकरण काय?
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कथित घोटाळ्यात २१०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला होता. ईडीची अशी माहिती आहे की, घोटाळ्यातील निधीचा काही भाग चैतन्य बघेल आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या रिअल इस्टेट कंपन्यांद्वारे लाँडरिंग करण्यात आला होता. ईडीचा मनी लाँड्रिंग खटला छत्तीसगड भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (एसीबी) ने नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. या अहवालात माजी उत्पादन शुलक मंत्री कवासी लखमा यांच्यासह ७० व्यक्ती आणि संस्थांची नावे राज्याच्या मद्य धोरणासंबंधी भ्रष्टाचार प्रकरणाशी जोडलेली आहेत.