
मुंबई, दहीहंडी खेळातील गोविंदांना मिळणाऱ्या विमा कवचाचा विस्तार करून १.५ लाख गोविंदांना याचा लाभ द्यावा, अशी मागणी दहीहंडी समन्वय समितीने केली. यासाठी समितीने क्रीडा मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत क्रीडा विभागाला निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र शासनाने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून या खेळात गोविंदांचा सहभाग वाढला असून, त्यासोबतच जोखीमही वाढली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ७५ हजार गोविंदांना विमा कवच दिले जात आहे. यंदा ही संख्या वाढवून १.५ लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि अन्य पदाधिकारी सहभागी होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मंत्री आशिष शेलार यांनी त्यांचे आभार मानले.