मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याचे निर्देश

17 Jul 2025 21:29:18

मुंबई,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, येथे मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी खालील प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.

भाईंदर-दहिसर लिंक रोड

भाईंदर पूर्व जेसल पार्क-घोडबंदर रस्ता

सूर्या धरणातून मीरा-भाईंदर शहराच्या पाणीपुरवठा योजनेची कामे

मीरा-भाईंदर शहरातील प्रस्तावित क्लस्टरचे आराखडे


धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी सवलती

एसटी महामंडळाची पडीक जागा मीरा-भाईंदर पालिकेच्या परिवहन विभागासाठी देणे

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत निर्देश दिले की, काशिगाव मेट्रो स्थानक ते काशिमिरा नाका तसेच मिरागाव ते काशिगाव मेट्रो स्थानकापर्यंतचे वाय आकाराचे पूल मुख्य पुलाशी जोडण्याच्या कामाला गती देण्यात यावी. तसेच मीरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्ता, काशिमिरा नाका ते रेल्वे फाटकपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करावा.

मीरा रोड परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता या ठिकाणी नवीन शिधावाटप कार्यालय सुरु करण्यात येईल. तसेच उपनिबंधक कार्यालयाच्या निर्मितीसाठी 35 पदांच्या निर्मितीचा प्रस्ताव पाठवण्यात यावा. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या जागांच्या आरक्षणाची यादी तयार करावी. शाळांकरिता किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी आरक्षित ठेवलेल्या जागा अन्य कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाहीत. अशी जागा वापरात येत असेल तर तत्काळ काम थांबवावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार नरेंद्र मेहता आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0