‘विरोधी’ नव्हे ‘विनोदी’ पक्ष

17 Jul 2025 12:39:47

मागेच त्यांच्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते की, अंगावर डास बसला, तर त्याला ते उडवू शकत नव्हते, तरीसुद्धा त्यांना त्यांच्या उजव्या की डाव्या हाताने ब्रॅण्ड मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला की, ते अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी पिपाणी का वाजवली नाही? हा काय प्रश्न आहे का? तसेही त्यांना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? त्यांच्यासोबत तुतारीवाले काका होते ना? तुतारी असताना पिपाणी वाजवण्याची गरजच काय? तर अशीही ब्रॅण्ड मुलाखत येणार आहे बरं का? आम्ही काही जळत नाही, उलट आम्ही खूश आहोत, लोकांचे पुन्हा एकदा ब्रॅण्ड मनोरंजन होणार आहे.

‘खंजिर, कट्यार, कोथळा, मराठी, मुंबई म्हणजे आम्ही’ वगैरे वगैरेच्या दशकभर यशाला मागे सारत, आता या मुलाखतीमध्ये भूतकाळातले ‘स्वयंभू ब्येस्ट शिएम’ काय बोलणार, असा प्रश्न पडू देऊ नका! ‘कोरोना’ काळात ‘फेसबुक लाईव्ह’ येऊन कमी का मनोरंजन केले त्यांनी? याच परिक्षेपात दिल्लीतले त्यांचे साथीदार राहुल गांधीही काही कमी नाहीत. त्यांचेही एकपात्री हास्य प्रयोग सदासर्वदा सुरूच असतात. त्या हास्यामध्ये हिंदूविरोधी विधान, जातपात वगैरे विध्वसंक विचार पेरायचे की झाले. मग, राहुल गांधींचे फेमस अंजिक्य असे एकमेव विचारविनोद. राहुल यांच्यासोबत उदित राज, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंग वगैरे वगैरे विनोद धूर्तवीर एकापेक्षा एक विधान करतात. त्यांच्या तुलनेत आमचे महाराष्ट्राचे साहेब कुठे आहेत असेही वाटते का? तर प्रश्नच नाही. साहेबांचे चिरंजीव, भरीस भर राहुल गांधींना ‘आप आए बहार आए’ म्हणणारे संजय आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, तसेच समस्त हिंदू देवदेवतांबद्दल अचकट-विचकट बोलणार्‍या अंधारे हे सगळे साहेबांचा वारसा जागवत आहेत. आता तर काय साहेबांचे नवे सहकारी जितू आव्हाड आणि अंबादास दानवे यांनी तर ‘चड्डी बनियन’ घालून लोकांचे मनोरंजन केले. काय म्हणता, लोकांनी यांना अशी फालतूगिरी करण्यासाठी निवडून दिले का? तर खामोश! विरोधी पक्ष येनकेन प्रकारे समस्त महाराष्ट्राचे मनोरंजन विनामूल्य करत आहेत, तर त्यावरही तुमचा आक्षेप? विनामूल्य गोष्टीची कदर नसते हेच खरे! काय म्हणता ‘विरोधी’ पक्ष नव्हे, ‘विनोदी’ पक्ष आहे?

कृतघ्न अपत्य!

बिहारमध्ये 84 वर्षांची सुदामा देवी मृत पावली. रितीप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिची सहा मुले एकत्र आली. मात्र, आईच्या मृतदेहासमोरच आईने मागे सोडलेल्या संपत्तीवरून त्यांचे वाद झाले. हा वाद सहा-सात तास चालला. गावकरी समजावत राहिले की, “अरे नंतर भांडा, आधी तुमच्या आईचे अंत्यसंस्कार करा.” मात्र, कुणीही थांबले नाही. शेवटी पोलीस आले आणि त्यांनी या सहा भावांना तंबी दिली. तेव्हा आईचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भयंकर! आज पालकांसोबत पाल्याचे मग तो मुलगा असो की, मुलगी यांचे संबंध कसे आहेत? तर वाढते वृद्धाश्रम याचे उत्तर देते. ज्या लेकरांना वाढवण्यासाठी आईबाबांनी, अख्खं आयुष्य खर्ची घातले, तेच आईबाबा वृद्ध झाल्यावर त्यांची स्थिती काय असते? गरिबांच्या घरी अडगळीचे सामान आणि श्रीमंतांच्या घरी समृद्ध जीवनाची अडगळ? अर्थात, हे चित्र हे सर्रास आहे असे नाही. काही घरांतच आईबाबांना त्यांच्याच मुलांकडून वनवास असेल. पण, या काही कुटुंबांची संख्या वाढत आहे. अशाच मनोवृत्तीच्या काही लोकांशी बोलले, तर त्यांचे मत, “आम्हाला जन्माला घाला म्हणून आम्ही त्यांना नवस केला नव्हता. आम्हाला जन्माला घातले, तर आमचे संगोपन करणे हे त्यांचे कर्तव्यच होते. जगभरातले आईबाबा जे करतात, तेच त्यांनी आमच्यासाठी केले त्यात वेगळे काय?” तर काहींची उत्तरे होती, “त्यांनी त्यांचे आयुष्य उपभोगले. आम्हाला आता मुक्त जगायचे आहे. त्यांची कटकट नको.” हे सगळे भयंकर वाटते. खरंच अशी विधाने करणारे लोक मी पाहिले आहेत. सरकारने वृद्ध मातापित्यांच्या संरक्षणासाठी कायदे, योजना कार्यान्वित केल्या. पण, ज्या पोटच्या गोळ्यासाठी आयुष्य पणाला लावले, तिच मुलं जेव्हा परकी होतात किंवा पैशाच्या लोभाने नातीगोती विसरतात, तेव्हा त्या मातापित्यांना काय वाटत असेल, हे शब्दातीत आहे. मुलांसाठी आयुष्यभर खपणार्‍या आईबाबांसोबत त्यांच्या वृद्धपणी जेव्हा मुलं कृतघ्नपणे क्रूर वागतात, तेव्हा कायदेशीर मदत मिळवण्याची आईबाबांची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती नसते. इज्जतीसाठी त्यांना पोलीस चौकी, न्यायालय नको वाटते. त्यामुळेच वाटते की, अशा कृतघ्न अपत्यांंविरोधात पीडित मातापित्यांना समाजाने सामाजिक न्याय द्यायला हवा.
9594969638
Powered By Sangraha 9.0