मुंबई, डीआरपीचे अधिकारी घरातील कर्ते मंडळी घरात नसताना ज्येष्ठ नागरिकांकडून जबरदस्तीने कागदपत्रांवर सही घेत असल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. 'अंगठे धरून संमतीच्या फॉर्मवर त्यांचे ठसे घेण्यात आले' असेही वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. मात्र,व्हिडिओत दिसणाऱ्या कुटुंबीयांशी दैनिक मुंबई तरुण भारतने संवाद साधला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. "अचानक आलेला घोळका हा कोणाला विचारून तुम्ही सर्व्हेक्षकांना इथे बोलवले? असे म्हणत आमच्यावर धावून आला. मी स्वतः आई वडिलांसोबत तिथे उपस्थित होतो. सर्वेक्षण आमच्या संमतीनेच झाले", असे कमलानगर येथील रहिवासी सुनील मित्र यांनी सांगितले. सुनील मित्रा हे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा मुलगा आहे.
४५ वर्षीय सुनील मित्र यांनी सांगितले की,"जो सर्वे झाला यामध्ये कोणीही आमच्यावर जबरदस्ती केली नाही. माझ्या आईचे एक तातडीचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे तिला दिसत नव्हते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आईच्या आणि माझ्या संमतीनेच अंगठा त्या कागदपत्रांवर घेण्यासाठी हात पुढे केला. मी स्वतः सर्वे अधिकाऱ्यांना घरी बोलावले होते. अचानक एक घोळका मोठा गोंधळ करत आला. कोणीतरी त्यात व्हिडीओ काढला. माझी आई त्यांना म्हणली देखील इतकी वर्षे आम्ही इथे काढली. काही भेटलं नाही. आम्हाला असुविधा आहे. आम्हाला चांगलं घर मिळत तर आम्हाला काहीही अडचण नाही." व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मित्र या आजोबांनी सांगितले,"तो घोळका माझ्या दिशेने आला आणि म्हणू लागला 'हमे पूछा क्या? ऐसे कैसे अपने इनके साथ बात किया?'", असे म्हणत त्या घोळक्याने या ज्येष्ठ नागरिकांना धमकाविण्याचा प्रयत्न केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.
व्हायरल व्हिडिओबाबत खा.वर्षा गायकवाड लिहितात
"हे सर्वेक्षण नाही, तर सरकारपुरस्कृत पिळवणूक आहे. हा व्हिडिओ पहा, धारावीच्या कमला नगर भागात जेव्हा अदानी सरकारच्या खोट्या आश्वासनांना स्थानिक नागरिकांनी नकार दिला, तेव्हा त्यांनी घरची कर्ती-कमावती मंडळी कामानिमित्त बाहेर असताना घरातल्या साध्याभोळ्या ज्येष्ठ नागरिकांना दमदाटी करून त्यांच्या सह्या कागदपत्रांवर घेण्याचा लाजिरवाणा प्रकार सुरू केलाय. अक्षरशः अंगठे धरून संमतीच्या फॉर्मवर त्यांचे ठसे घेण्यात आले. एका वृद्ध महिलेकडून बळजबरीनं अंगठ्याचा ठसा घेतला जातो", असे ट्विट खासदार वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
"गेली ५० वर्षे आम्ही इथे राहतो. सर्व्हेक्षण करणाऱ्या टीमने कोणतीही जबरदस्ती केली नाही. त्यांना मीच बोलावलं होत. उलट जी लोक अचानक आरडा ओरड करत आले ते म्हणू लागले कि यांना सर्व्हेक्षण करायला तुम्ही कशाला बोलावलं? कोणाला विचारून हे इथे आले आहेत. मी म्हणाले या घाणीत राहून राहून आम्ही कंटाळलो आहोत. कमरेपर्यंत गाळ असणाऱ्या रत्यांवरून वाट काढलीये. कोणीही काहीच केलं नाही आमच्यासाठी, इतक्या घाण पाण्यात दिवस काढले आम्ही. जे आता होत आहे ते होऊ द्या ! मला सही नाही येत म्हणून त्यांनी माझा अंगठा घेतला".
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.