Chinnaswamy Stadium stampede report to be released : चेंगराचेंगरीला आरसीबी संघ व्यवस्थापन कारणीभूत! सरकारी अहवालात ठपका
17 Jul 2025 12:46:35
(Credit - PTI)
बंगळुरू : रॉयल चॅलेंजर बंगळुरूने आयपीएल चषक जिंकल्यानंतर आयोजित केलेल्या विजयोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीला संघ व्यवस्थापन जबाबदार आहे, असा अजब दावा कर्नाटक सरकारने केला आहे. विराट कोहलीचा एक व्हिडिओही यासाठी पुरावा म्हणून सरकारने कोर्टात सादर केला आहे. ४ जून रोजी झालेल्या या घटनेत एकूण ११ जणांचा मृत्यू झाला होता.या संदर्भात उच्च न्यायालयात राज्य सरकारने सादर केलेल्या अहवालानुसार, आरसीबी संघ व्यवस्थापन आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मेर्सस डीएनए नेटवर्क्स प्रा.लि. आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांनी विजयी जल्लोष सोहळ्याचे आयोजन केले.
मात्र, यावेळी कर्नाटक पोलीस आणि प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्याच नाहीत. १२ जून रोजी हा अहवाल सादर करण्यात आला असून न्यायालयाने तो ८ जुलै रोजी जाहीर केला आहे. आरसीबीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे विराट कोहलीचा विजय जल्लोषाच्या प्रसिद्धीसाठी एक व्हिडिओ शेअर केला होता, असेही सरकारने म्हटले आहे. या अहवालानुसार, ३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘केएससीए’चे सीईओ यांनी ईव्हेंट कंपनीसाठी कब्बोन पार्क पोलीस ठाण्यात एक पत्र सादर केले होते. या पत्रात पंजाब किंग्ज सोबत अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्यात जर बंगळुरू संघ जिंकला तर स्टेडिअमच्या जवळ विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.
मात्र, पोलीसांनी अपुरी माहिती, जमावसंख्या, आयोजन याबद्दल स्पष्टता नसल्याने पोलीसांनी परवानगी नाकारली होती. तरीही आरसीबीने ४ जून रोजी सकाळी ७.०१ वाजता त्यांच्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पोस्ट केली. चिन्नस्वामी स्टेडिअमवर हा सोहळा होईल याबद्दल अधिकृत घोषणा पुन्हा एकदा सकाळी ८.०० वाजता केली. याच दिवशी सकाळी ८.५५ मिनिटांनी विराट कोहलीचा एक व्हिडिओ आरसीबीद्वारे पोस्ट करण्यात आला. ज्यात टीम बंगळुरूला ४ जून रोजी परतल्यावर विजयी जल्लोष सोहळा होणार असल्याचे स्पष्ट म्हटले होते. त्यानंतर ३.१४ मिनिटांनी या संदर्भातील आणखी एक पोस्ट करण्यात आली.
ज्यात सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या दरम्यान विजयी जल्लोष सोहळ्यासाठी लागणाऱ्या मोफत पासेसची घोषणा करण्यात आली. Shop.royalchallengers.com या संकेतस्थळावर हे पास मोफत मिळणार असल्याचे यात म्हटले होते. अनुक्रमे पहिल्या पोस्टला १६ लाख, दुसऱ्या पोस्टला ४.२५ लाख तिसऱ्या पोस्टला ७.६ लाख आणि अखेरच्या पोस्टला १७ लाख व्ह्यूज आले होते.“पोलीस ठाण्याला दिलेल्या माहितीत नमूद तक्त्यांनुसार माहिती देण्यात आली नव्हती. यात महत्वाची माहिती देण्यात आलेली नव्हती. यामुळे पोलीस प्रशासनाला याबद्दल नियोनासाठी वेळच मिळालेला नाही. हे कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन मानले जाईल.”, असेही या अहवालात म्हटले आहे.