मुंबई: आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुरुवार, १७ जुलै रोजी विधानभवनात तुफान हाणामारी झाली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे राजकीय पडसाद उमटले.
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधीमंडळाच्या तळमजळ्यावर हाणामारी केली. तसेच यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली. दरम्यान, तेथील सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना सोडवले.
मागील काही दिवसांत गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात खटके उडताना पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात जात असताना रेड कार्पेटरवरच नाव न घेता पडळकर यांना डिवचले होते.
बुधवारी विधानभवनाच्या परिसरात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या वादाचे पडसाद उमटले असून दोघांच्याही समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची थेट कपडे फाटेपर्यंत बाचाबाची झाली.
यावर सर्वात आधी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनीच हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच विधानसभेत आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचे आमदार? असा संतप्त सवालही त्यांनी केला. तर मला काहीही माहिती नाही असे म्हणत पडळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देणे टाळले.