देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंमध्ये २० मिनिटे चर्चा

17 Jul 2025 20:26:04

मुंबई,
 उबाठा गटाचे पक्षप्रमुख आ. उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधानभवनातील अँटी चेंबरमध्ये त्यांच्यात सुमारे २० मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत आमदार आदित्य ठाकरे देखील सहभागी होते.

सूत्रांनुसार, या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आपली भूमिका मांडताना ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला?’ हे पुस्तक मुख्यमंत्र्यांना भेट दिले. तसेच, नव्याने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनाही हे पुस्तक देण्याची विनंती त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार भास्कर जाधव, सुनिल प्रभू, सचिन अहिर, अजय चौधरी, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, सुनिल राऊत, जगन्नाथ अभ्यंकर, महेश सावंत, बाळा नर, संजय देरकर आणि प्रवक्ते हर्षल प्रधान उपस्थित होते.



Powered By Sangraha 9.0