तेलंगणातील 'ती' १४ गावे महाराष्ट्रातीलच! मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

16 Jul 2025 14:51:29

मुंबई : तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेवर असलेली चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे महाराष्ट्रातील असून त्यांना समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बुधवार, १७ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.


मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावे तेलंगणा आणि महाराष्ट्र सीमेवर आहेत. महाराष्ट्राच्या जमावबंदी आयुक्तांच्या रेकॉर्डप्रमाणे ही सर्व गावे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे त्या सर्व गावांचे गावठाण महाराष्ट्रातच राहील याबद्दलची कारवाई आम्ही सुरू केली आहे. यासंबंधीचे पुरावे आणि रेकॉर्ड आमच्याकडे असून महाराष्ट्र शासनाने त्याची नोंद घेतली आहे."


महाराष्ट्रातच मतदान


"या सर्व गावांतील नागरिक महाराष्ट्रातील मतदार असून ते महाराष्ट्रातच मतदान करतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या ग्रामपंचायती महाराष्ट्राचाच भाग राहणार आहेत. त्यामुळे यात कोणताही संभ्रम नाही. काही काळ असा होता की, दोन्ही राज्यांतील व्यवहार सारखाच होता. पण आता जिवती तालुक्यातील या चौदाही ग्रामपंचायतीतील गावे महाराष्ट्रात असतील. तेलंगणा राज्याकडे रेकॉर्ड नसल्याने त्यांनी दावा केला तरी तो मजबूत होणार नाही. या गावांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच त्याचा अंतिम निर्णय होईल," असेही त्यांनी सांगितले.


विचारांची लढाई लढा, रस्त्यावरची नाही!


प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले की, "प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा मी निषेध करतो. त्यांच्यावर झालेला हल्ला मान्य नाही. अडीच वर्षांपूर्वी दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला मी गेलो असता तो चांगले काम करेल, असे मी बोललो होतो. पक्षात कुणी येत असताना आपण हे बोलतो. पण दीपक काटेने प्रवीण गायकवाडांसारख्या कार्यकर्त्यावर हल्ला करणे चुकीचे आहे. विचारांची लढाई असू शकते. पण अशा हल्ल्याचे समर्थन होऊ शकत नाही. भाजप या हल्ल्याचे समर्थन करत नाही. दीपक काटेवर नियमाप्रमाणे सर्व कारवाई झाली पाहिजे. कुणावर हल्ला करून लढाई लढण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचे समर्थन नाही. समाजसमजात तेढ निर्माण करणे हा आमचा धंदा नाही. आम्ही संस्कार, संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे अशा घटनांचे समर्थन नाही. आम्ही विचारांची लढाई लढणारे आहोत रस्त्यावरची लढाई लढणारे नाहीत," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.



Powered By Sangraha 9.0