भाषा : संस्कृतीसंवहनाचे माध्यम

16 Jul 2025 11:56:10

भाषिक वसाहतवाद हा अ-युरोपीय देशांना समतल स्पर्धेच्या संधी नाकारतो. भाषिक क्षमतांच्या एकांगी विकासाच्या आग्रहाने युरोपीय देशांना आर्थिक विकासामध्ये सतत झुकते माप मिळत राहते. आर्थिक सामर्थ्याच्या आधारावर भाषिक वसाहतवाद आणि पर्यायाने वंशश्रेष्ठत्वाची अथवा राष्ट्रीय श्रेष्ठत्वाची भावना जरी उघडपणे दाखवली गेली नाही, तरी मनातून सतत जागृत ठेवली जाते. भाषिक वसाहतवादाचे उघडपणे दिसणारे हे पैलू आपण मागच्या आठवड्यात पाहिले. परंतु, ही भाषिक भिन्नता प्रगतीच्या मार्गातील अडसर नेमका कसा बनते आणि या भिन्नत्वाच्या मुळाशी असलेले सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ कोणते, त्याचा थोडा विचार या प्रश्नाच्या मुळाशी जाताना आवश्यक आहे.

संस्कृती आणि भाषा यांचा परस्परसंबंध समजावून घेण्यासाठी आपण सुरुवातीस एक साधे मराठी भाषेतील उदाहरण पाहू. धोतर किंवा साडी ‘नेसणे’ असा वाक्यप्रयोग आपण जेव्हा करतो, तेव्हा नेसण्याच्या क्रियेमधील सर्व उपक्रिया आपल्या आपोआप लक्षात येतात. या क्रियेचे वर्णन कोणत्याही एका इंग्रजी शब्दाने चपखल होत नाही. असे का याचा विचार केल्यास असे लक्षात येईल की, इंग्रज समाजात साडी किंवा धोतरासारखे वस्त्र नाही. त्याच्याशी साधर्म्य असणारी वस्त्रे असली, तरी ती पेहरण्याची विवक्षित पद्धत नेसण्यासारखी नाही. त्या समाजाला ‘धोतर नेसलेला पुरुष’ म्हटल्यावर कोणतीही दृष्य प्रतिमा डोळ्यासमोर येत नाही. साहजिकच ज्या समाजाच्या व्यवहारात धोतर किंवा साडीसारखे वस्त्र वापरणे, ते विशिष्ट पद्धतीनेच पेहरणे यासारखे क्रियाकलाप नाहीत. त्या समाजाच्या भाषेत त्यासाठी शब्द असण्याची आवश्यकता नाही. या उदाहरणातून दिसणारे तत्त्व आपल्याला संस्कृती म्हणजे काय आणि तिचा भाषेशी संबंध नेमका कसा असतो, या विषयाचे विवेचन करण्यासाठी वापरता येईल.

एखाद्या समाजाने स्वतःच्या अंतर्गत व्यवहारांचे, चालीरीतींचे वर्णन करण्यासाठी त्या समाजाची भाषा विकसित केलेली असते. स्वाभाविकपणे जे व्यवहार समाजात प्रचलित नाहीत, त्यांचे प्रतिबिंब त्या समाजाच्या भाषेत पडणे अवघड असते. समाजाचे सर्व व्यवहार, त्या व्यवहारांना अनुसरून निर्माण केली गेलेली कर्मकांडे, विविध कार्यांसाठी आवश्यक अशा वस्त्रप्रावरण, भांडीकुंडी अथवा धातुपात्रे, अलंकार, शस्त्रे इत्यादी वस्तू, या सर्वांच्या वापराचे विशिष्ट विधी, या सर्व वस्तू आणि विधींना सौंदर्य आणणार्‍या कला आणि या सर्व कार्यांचे मूळ कारण स्पष्ट करणारे तत्त्वज्ञान या सर्वांना जर एकत्रितपणे ‘संस्कृती’ असे आपण संबोधले, तर हे उघडच आहे की, भाषेची निर्मिती संपूर्ण समाजाने विविध सांस्कृतिक कार्यांमध्ये सहभाग घेताना स्वाभाविकपणे होत असते. त्यामुळेच जी कार्ये त्या संस्कृतीमध्ये आणि समाजामध्ये घडतच नाहीत, त्या कार्यांसाठी त्या भाषेत शब्दच बरेचदा उपलब्ध नसतो. उदाहरणार्थ ‘फोडणी’ या शब्दाला इंग्रजीत प्रतिशब्द नाही आणि यासाठी मराठीत प्रतिशब्द नाही. याचे कारण म्हणजे, आपल्या (अनुक्रमे इंग्रजांच्या) खाद्यसंस्कृतीत ही क्रिया कधी केलीच जात नाही.

भाषांचे हे संस्कृतीसापेक्ष भिन्नत्व केवळ शब्दांपुरते मर्यादित राहत नाही, तर किंबहुना त्याहूनही अधिक प्रमाणात ते वाक्यप्रयोगांना लागू असते. शब्दांना जरी नेमके प्रतिशब्द नसले, तरी वर्णनात्मक अनेक शब्द वापरून त्या शब्दांचे रूपांतर करता येते. पण, जिथे संकल्पनात्मकच भिन्नता असते तिथे असे रूपांतर बरेचदा शक्य होत नाही आणि केलेच तर त्याचा अनर्थ होण्याची शक्यता असते. त्यामुळे संस्कृतातील वचन ‘मौनं सम्मतिलक्षणम्’ इंग्रजीत गेल्यावर असे विरुद्धरूपी होते. या अर्थांतराचे एक चिंतनीय उदाहरण म्हणजे जन्मदिनाच्या वेळी म्हटले जाणारे हे गाणे. या वाक्यात अंतभूर्र्त असलेली किती ख्रिस्ती तत्त्वे हिंदू संस्कृतीशी आणि मान्यतांशी विसंगत आहेत, हे नीट विचार केल्यास लक्षात येऊ शकते. आपल्याकडे आशीर्वाद देणे हे सर्व व्यक्तींना शक्य आहेच, इतकेच काय आपण गायीचाही आशीर्वाद घेत असतो. ख्रिस्ती धर्मात मात्र असा आशीर्वाद फक्त ईश्वर देऊ शकतो आणि त्याने तो द्यावा, अशी प्रार्थना फक्त मानवास करता येते. संकल्पनांमधील हा फरक अनेक भाषिक फरकांना जन्म देतो आणि त्याचे योग्य आकलन न झाल्यास संकल्पनात्मक स्पष्टताही हळूहळू नष्ट होऊ शकते.

संस्कृती ही ज्याप्रकारे विशिष्ट भाषेस जन्म देते, त्याचप्रकारे भाषा ही संस्कृतीची वाहक म्हणून कार्य करते. एखादा शब्द जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा आपल्याला केवळ त्याचा शब्दार्थ ध्यानात येत नाही, तर त्याने निर्देशित केलेली वस्तू अथवा क्रिया याचे चित्र आपल्या मनात उमटते. त्याअनुषंगाने काही विशिष्ट भावना आपल्या मनात निर्माण होतात, काही स्मृती जाग्या होतात. त्या स्मृतींच्या आणि भावनांच्या संदर्भातील विशिष्ट संकल्पनांचे आपल्याला स्मरण होते. ‘हे काका वारीला जाऊन आले आहेत, त्यांना नमस्कार कर’ असे आपण जेव्हा घरातल्या लहान मुलाला सांगतो आणि त्याच्यापाठोपाठ आपणही त्या घरी आलेल्या गृहस्थांना नमस्कार करतो, तेव्हा त्या वाक्याचा केवळ शब्दार्थ महत्त्वाचा नसतो, तर त्यातून वारी म्हणजे काय, ती कशासाठी करतात, तिची परंपरा काय, वारकरी मंडळींचे समाजात स्थान काय, हा सर्व भाव तर व्यक्त होतोच. पण, त्याचबरोबर आपले कर्म काय, आपले समाजाप्रति कार्य काय आणि सरतेशेवटी आपले मूळस्वरूप काय, या सर्वांचाही बोध होत असतो. हे वाक्य पुन्हा एकदा वाचले, तर असे लक्षात येईल की, संस्कृती आणि भाषा यांच्या संबंधाचे उदाहरण देताना जे अनेक शब्द वापरले गेले आहेत, त्यांनाही जे अर्थ आहेत, त्या आपल्या संस्कृतीच्या सापेक्षच आहेत. याच विधानाचा व्यत्यास असा की, जर भाषिक वेगळेपण आणि नेमकेपण जोपासले नाही, तर सांस्कृतिक कंगोरे नष्ट होऊन भिन्न समाजांचे एक सांस्कृतिक सपाटीकरण होण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे भाषा ही जशी विशिष्ट संस्कृतीच्या आधारे निर्माण होत असते; तसेच संस्कृतीचा पुढील पिढ्यांकडे जाणारा प्रवाह हा भाषेच्या माध्यमातून होत असतो. सांस्कृतिक वसाहतवादापासून मुक्ती ही भाषिक वसाहतवादापासून मुक्तीच्या प्रयत्नांपासून वेगळी काढता येत नाही. कारण, आपल्या संस्कृतीची संपूर्ण अभिव्यक्ती ही परकीय भाषेतून अशक्य असते.

परंतु, भाषेसंबंधी विचार करताना प्रत्येकच भाषेचा वेगळा विचार आणि त्यानुसार वेगळ्या संस्कृतींचा विचार असे शक्य किंवा योग्य आहे का, हेही तपासून घ्यायला हवे. आपण असे म्हणतो की, दर बारा कोसांवर भाषा बदलते. मग इतक्या विविध भाषा नकोत म्हणून आपण भाषेचे प्रमाणीकरण करून ‘भाषा’ आणि ‘बोली’ असे विभाजन करतो. कुठल्याही विषयाचे प्रमाणीकरण करण्याच्या युरोपीय अभ्यासप्रणालीनुसार असे वर्गीकरण करणे भाषेचा जो मूळ उपयोग की, मानवी समाजाच्या अनुभवांना शब्दांकित करणे त्यास सीमित करते. त्यामुळे भाषा आणि संस्कृती यांच्यातील अन्योन्यसंबंधांचा विचार करताना या दोन्हीचा संकुचित अर्थ लावणे चुकीचे ठरू शकते. भारताचा विचार केल्यास इथे अनेक उपनद्यांनी समृद्ध होणार्‍या गंगा, नर्मदा किंवा गोदावरीसारख्या नद्या ज्याप्रकारे सरतेशेवटी समुद्रास मिळतात. त्याचप्रमाणे, अनेक स्थानिक चालीरिती, परंपरा, सणसमारंभ यांनी समृद्ध होत आणि अनेक भाषांमधून व्यक्त होत एक भारतीय संस्कृती गेली कित्येक सहस्र वर्षे विकसित होत आलेली आहे. या संस्कृतीचीच अक्षयधारा सर्व भारतीय भाषांना चेतना देणारी आहे आणि त्यामुळेच या भाषांमधून व्यक्त होणारा भाव एकसमान आहे.

किंबहुना, भारताच्या संदर्भात भाषांमधील साम्यस्थळे आणि भेद आणि त्यांच्या स्वीकाराची एक विशिष्ट परंपरा हे भारतीयत्वाच्या मूललक्षणांपैकी एक तर म्हणता येईलच. पण, जागतिक स्तरावर या भाषिक भेदांना महत्त्व न देता, त्या भाषांमधून आणि शब्दांमधून जो भाव व्यक्त होत आहे, तो जाणून घेण्याचे तत्त्व सर्व व्यक्तींना कसे स्वतःत बाणवता येईल, याचा एक आदर्श वस्तुपाठही आहे. वैविध्य जपत एकात्म तत्त्वास समजून घेण्याची ही परंपरा निश्चितच हिंदू अध्यात्म दर्शनातून विकसित झालेली आहे. दुर्दैवाने आज आपण भाषेकडे केवळ एक सामान्य व्यवहारांच्या संदेशवहनाचे माध्यम म्हणून पाहतो. नेहमीच्या बोलण्यापेक्षा अधिक सखोल भाषेचे अध्ययन आपल्याला अनावश्यक वाटू लागलेले आहे. भाषा शिकणे म्हणजे केवळ संभाषणास आवश्यक असे किमान शिक्षण नव्हे, भाषेतील शब्दयोजना, त्यांचे व्याकरण, त्यांची व्युत्पत्ती यांचा अभ्यास आपल्याला एकप्रकारे त्या भाषक समूहाच्या संस्कृतीचीच माहिती देत असतो. आपण आपलीच भाषा जर नीट शिकलो नाही, आपल्या भाषाकुलातील अन्य भाषांची अवहेलना करून आपले भाषिक ज्ञान मर्यादित ठेवले, तर आपल्याच संस्कृतीची मुळे हळूहळू सैल होत हा वृक्ष उन्मळून पडण्यास वेळ लागणार नाही आणि आपली स्वतःची भाषा पक्की नाही, इंग्रजी कामापुरती संभाषणात्मक शिकलेली अशा अवस्थेत आपल्या भावविश्वाची नेमकी अभिव्यक्ती कशी होऊ शकेल? आणि ती न झाल्यास ज्याप्रकारचे मानसिक ताण निर्माण होतील, त्यांच्या निराकरणाचे काय मार्ग असू शकतील?
भाषा आणि संस्कृतीमधील संबंध हा कितीही पुस्तकी वाटला, तरी तो प्रत्येक व्यक्तीच्या नैसर्गिक अभिव्यक्तीशी निगडित आहे हे लक्षात घ्यायला हवे. वैचारिक आणि सांस्कृतिक दास्यातून मुक्ती ही जशी सामाजिक चळवळ आहे, तसाच तो प्रत्येक व्यक्तीचाही संघर्ष आहे. या मुक्तीची अर्थवाही घोषणा फक्त स्वभाषेतूनच होऊ शकते. परकीय संस्कृतींचे संवहन करण्यासाठी बनलेली भाषा जशी आमच्या संस्कृतीच्या संवहनास असमर्थ असेल. तसेच, परकीय भाषेच्याच प्रवाहातून वाहणे भाग पाडल्यास आमची सांस्कृतिक अस्मिता टिकणेही दुष्प्राप्य ठरेल.

(लेखकाने मुंबईतील ‘टीआयएफआर’ येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)

डॉ. हर्षल भडकमकर
9769923973
Powered By Sangraha 9.0