गडचिरोलीतील मरकणार ते अहेरी बससेवेचा प्रारंभ - गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात एसटीची धाव , स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच मार्गावर धावणार एसटी, नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात केले बसचे स्वागत

Total Views | 5

गडचिरोली, गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास कराचा लागत असतो. अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातुन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा मरकणार ते अहेरी बस सेवेला स्वातंत्र्यानंतर प्रथमच सुरुवात करण्यात आली. बुधवार दि.१६ रोजी या बससेवाला प्रारंभ करण्यात आला. मरकणार या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस आल्यामुळे भागातील नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचे स्वागत केले आहे.

याचवर्षी दि.१ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गदेवाडा-वांगतुरी या बस सेवाचा शुभारंभ झाला. तसेच, दि. २७ एप्रिल २०२५ रोजी कटेहारी ते गडचिरोली बस सेवा देखील सुरु करण्यात आली. या दुर्गम भागात मागील पाच वर्षांमध्ये ४२०.१५ कि.मी. लांबीच्या एकूण २० रस्त्यांसोबतच एकूण ६० पुलांचे बांधकाम पोलीस संरक्षणात पूर्ण करुन घेण्यात आले आहे. याप्रमाणेच भामरागड उपविभागातील छत्तीसगढ़ सीमेपासून अवघ्या ०६ किमी. अंतरावर असलेल्या अतिदुर्गम मौजा मरकणार येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध होऊन त्यांना तहसिल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी आता ही मौजा मरकणार ते अहेरी बस सुरु करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमाडच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम मरकणार या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच बस आल्यामुळे भागातील नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवत जल्लोषात बसचे स्वागत केले आहे. मौजा मरकणार गावचे गाव पाटील झुरु मालु मट्टामी यांनी या बस सेवेचे उद्घाटन केले तसेच यावेळी सिआरपीएफ ३७ बटा. जी कंपनीचे असिस्टंट कमांडंट अविनाश चौधरी तसेच पोलीस स्टेशन, कोठीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिलीप गवळी यांनी हिरवा होंडा दाखवून बस मार्गस्थ केली. यावेळी पोलीस दलामार्फत उपस्थित नागरिकांमध्ये मिठाईचे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात आला. याभागात बससेवा सुरु झाल्यामुळे याचा लाभ मरकणार, मुरुममुशी, फूलनार, कोपर्शी, पोयास्कोटी, गुंडूरवाही वा गावातील जवळपास १२०० हुन अधिक नागरिक, रुग्ण, विद्यार्थी, प्रवासी यांना होणार आहे. या मार्गावरील एस.टीच्या सुविधेमुळे गावकऱ्यांना वर्षभर सहज प्रवास करता येईल.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या नागरी कृती उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मरकणार गावातील नागरिकांनी दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एकमताने नक्षल गावबंदी ठराव पारीत करुन माओवाद्यांना कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही असे घोषित केले होते. या अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास होण्यासाठी गतवर्षी पोलीस संरक्षणामध्ये कोठी ते मरकणार रस्ता तयार करण्यात आला असून मरकणार ते मुरुमभुशी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी मरकणार गावात एअरटेल टॉवरचे बांधकाम करण्यात आले आहे.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121