मुंबई, राज्य परिवहन महामंडळाने ५१५० ई-बस प्रकल्पांतर्गत आत्तापर्यन्त २४० बसेसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. पुरवठादारास आगाऊ रक्कम अदा करण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानपरिषदेत उपस्थित तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.
दरम्यान, विधानपरिषद सदस्य राजहंस सिंह यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने इव्हे ट्रान्स कंपनीशी विजेवर चालविण्यात येणाऱ्या ५१५० बस कंत्राटी पध्दतीने घेण्याचा करार केला असून दर महिन्याला २१५ बसेस पुरवठा करण्यात कंपनीला अपयश आल्यामुळे सदर कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आल्याची बाब माहे मे, २०२५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे का? इव्हे ट्रान्स कंपनीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत केलेल्या करारानुसार महामंडळास आतापर्यंत किती बसेसचा पुरवठा केला त्यासाठी किती आगाऊ रक्कम अदा करण्यात आली आहे? या प्रकरणी राज्य परिवहन मंडळास विलंबाने बसेस पुरवठा करणाऱ्या इव्हे ट्रान्स कंपनीचा खरेदी करार केव्हा रद्द आला आहे तसेच सदर इव्हे ट्रान्स कंपनीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.
यप्रश्नावर उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी लेखी उत्तरात सांगितले की, कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आलेला नाही. ५१५० ई-बस प्रकल्पांतर्गत आज अखेर २४० बसेसचा पुरवठा करण्यात आलेला आहे. या पुरवठादारास कोणतीही आगाऊ रक्कम अदा करण्यात आलेली नाही. पुरवठादार कंपनीसमवेतचा करार रद्द करण्यात आलेला नाही. मात्र, बसेसचा पुरवठा विलंबाने केला असल्याने पुरवठादार कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.