मत्स्यासन : हृदयविकार टाळण्यासाठी हे अत्यंत उपकारक आसन आहे. प्रथम पद्मासनात बसून क्रमाक्रमाने हाताच्या आधारे कोपर, पाठ व डोके जमिनीवर ठेवून, डोक्याचा मध्य जमिनीवर ठेवून हातांनी पायाचे अंगठे धरावे. कोपर जमिनीवर दाबत छातीचा भाग वर उचलून थांबा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या व घशातून आवाज करत सोडा. अशी पाच आवर्तने करा.
भद्रासन : कृती : पावलांनी नमस्कार करून दोन्ही हातांनी पाऊले पकडा. डोके उचलून हनुवटी छातीला टेकून ठेवा. अशी तीन आवर्तने करा.
श्वानासन : श्वान म्हणजे कुत्रा. त्याप्रमाणे हात व गुडघ्याच्या आधाराने थांबून, छातीचा भाग किंचित जमिनीकडे दाबून तोंड उघडावे. जीभ बाहेर ठेवून कुत्रा ज्याप्रमाणे श्वासाचा आवाज करतो, तसा श्वास सोडत आवाज करायचा. दोन ते तीन आवर्तने करा.
योगनिद्रा: शवासनात थांबून स्वयं किंवा बाह्य सूचनेनुसार शरीराच्या प्रत्येक अवयवाला स्वस्थ, सुदृढ आणि ताणविरहित अशा शब्दांनी मनाने सूचना देत तो तो भाव त्या त्या अवयवात निर्माण करत पायाच्या अंगठ्यापासून शीर्षापर्यंत जावे. परत उलट प्रवास करावा व नाभीवर मन स्थिर करून तेथील सूक्ष्म कंपनांवर एकाग्र व्हावे. झोप केव्हा लागेल, हे कळणार नाही. हळूहळू जागृतावस्थेत येऊन वामकुक्षी करावी. योगनिद्रा लावण्याआधी आपल्याला कोणीतरी 15 ते 20 मिनिटांनी जागं करेल, ही व्यवस्था ठेवावी.
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
-डॉ. गजानन जोग