अपंग व्यक्तींवरील विनोद केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समय रैनासह चार जणांना फटकारले!

15 Jul 2025 19:38:39

नवी दिल्ली(Disabled Persons and it’s Dignity): अपंग व्यक्तींविषयी असंवेदनशील भाष्य केल्याच्या प्रकरणी कॅामेडियन समय रैना, विपुन गोयल, बलराज सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांना मंगळवार, दि.१५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या.जयमाला बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा असतात आणि त्याचा उपयोग इतरांच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करण्यासाठी होऊ शकत नाही.”

या प्रकरणात एसएमए क्युअर फाउंडेशनने दाखल केलेल्या याचिकेमध्ये आरोप करण्यात आला आहे की, वरील कलाकारांनी ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमामध्ये अपंग व्यक्तींविषयी असंवेदनशील आणि अपमानास्पद भाष्य केले आहे. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्या. सूर्यकांत यांनी इंडियाज गॉट लेटेंटच्या विनोदी कलाकारांची कडक शब्दात कानउघाडणी करत म्हटले की , “ही अपंग व्यक्तींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी गोष्ट आहे. तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जीवन आणि प्रतिष्ठेच्या अधिकारावर मात करू शकत नाही," असे न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणात अपंग व्यक्तींविषयी असंवेदनशील विनोद करणारे समय रैना, विपुन गोयल, बलराज सिंग घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर खंडपीठासमोर हजर झाले होते. खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, पुढच्या सुनावणीत त्यांना अनुपस्थित न राहण्याची सक्त ताकीद दिली. खंडपीठाने सांगितले की, “अशा प्रकारच्या विनोदांचा गंभीर सामाजिक परिणाम होतो आणि अशा गोष्टी भविष्यात रोखण्यासाठी एक सुसंगत मार्गदर्शिकेची आवश्यकता आहे.”असे मत खंडपीठाने व्यक्त केले.

युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्यावर कोर्टाचे ताशेरे!
याच सुनावणीदरम्यान युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या प्रकरणाचा उल्लेख करत खंडपीठाने अलाहाबादिया यांचे ते विधान ‘घाणेरडे आणि विकृत’ असल्याचे सांगितले आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील गोष्टींवर भाष्य करण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली.

याप्रकरणाच्या पुढील सुनावणीत फाउंडेशनच्या आरोपांवर आणि संभाव्य मार्गदर्शक तत्त्वांवर खंडपीठाकडून सखोल चर्चा केली जाण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, संबंधित कलाकारांना खंडपीठाने दिलेल्या मुदतीत उत्तर सादर करणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0