"...त्याचा राजकारणाशी संबंध नाही"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ! युतीबाबत सस्पेन्स कायम

15 Jul 2025 16:27:03

नाशिक : (Raj Thackeray on MNS-UBT Alliance) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यात एकत्र आल्यावर राजकीय वर्तुळात आता मनसे आणि उबाठाच्या युतीच्या चर्चेने जोर धरला. मात्र दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचे बोलत असले तरी राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरेंच्या एका वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार की नाही यासंदर्भात सध्या चर्चा सुरू असताना अशातच आता यासंदर्भात राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. "नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर युतीसंदर्भात बघू", असे विधान राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय शिबिरादरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केले. तसेच "विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही", असेही ते म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तीन दिवसीय शिबिर इगतपुरीमध्ये सुरू झाले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या विजयी मेळाव्यानंतर हे पहिलेच राज्यस्तरीय शिबिर आहे. या शिबिरासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे कालच इगतपुरीमध्ये दाखल झाले होते. या शिबिरासाठी राज्यातील मनसेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. राज ठाकरे आज नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.



Powered By Sangraha 9.0