कोल्हापुरातील माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

15 Jul 2025 16:24:33


मुंबई : कोल्हापुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी मंगळवार, १५ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.


यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. सुधीर गाडगीळ, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक, आ. बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार, करण देवतळे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.


कोल्हापूरचे काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह उबाठा तसेच शरद पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये करवीर तालुक्यातील व्हिजन ग्रूपचे अध्यक्ष जनसुराज्यचे संताजी घोरपडे, काँग्रेसचे प्रसाद जाधव, वैभवराज भोसले, राजेंद्र थोरवडे तसेच मुंबईतील उबाठा गटाचे मंदार राऊत, संकेत रुद्र यांचा समावेश आहे.


यासोबतच चंद्रपूर येथील उबाठाचे जिल्हाप्रमुख आणि चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे आणि उबाठाचे सभापती वासुदेव ठाकरे यांच्यासह निफाड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनीसुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला.


यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, "या सर्वांच्या साथीमुळे कोल्हापुरातील विकासाची कामे अधिक गतीने पूर्ण होतील. प्रवेश केलेल्या सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या विश्वासास सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते पात्र ठरू," अशी ग्वाही त्यांनी दिली.



Powered By Sangraha 9.0