राजकीय ‘तुषार’, जनता हुशार!

15 Jul 2025 11:51:34
 
Mahatma Gandhi, his great-grandson Tushar Gandhi embarked on a foot march from West Champaran in Bihar
 
 
महात्मा गांधींच्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचे पणतू तुषार गांधी यांनी बिहारमधील पश्चिम चंपारणपासून पदयात्रा काढली. पदयात्रा तुरकौलिया येथे आली असता, चंपारण सत्याग्रहादरम्यान ज्या झाडाखाली बसून महात्मा गांधींनी शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्या, त्याच झाडाखाली बसून तुषार गांधी गांधीवादाचे धडे देऊ लागले.
 
मात्र, त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधन अर्थात काँग्रेस आणि राजदला मतदान करण्याचे आवाहन केले. यानंतर स्थानिक भडकले आणि तुषार गांधी यांना तेथून पिटाळले. “हा गांधीवाद नाही, तर राजकीय वाद आहे,” असे तेथील स्थानिकांनी सांगत तुषार गांधींवर चांगलेच तोंडसुख घेतले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तम काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. रा. स्व. संघाला याच तुषार गांधींनी विषाची उपमा दिली होती.
 
लोकसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभांना तुषार गांधींनी हजेरी लावली होती. त्यावेळी महाविकास आघाडी विचारांचा कचरा राज्यातून बाहेर फेकून देईल, असे त्यांनी भाषणात म्हटले. एवढच नव्हे, तर महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. “वंचित बहुजन आघाडी आणि ‘एमआयएम’ ही भाजपची बी टीम असून त्यांना कुणीही मतदान करू नका,” असे आवाहनही त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान केले होते. महायुती म्हणजे गद्दारांची युती अशी टीकाही त्यांनी केली होती. ही सर्व वक्तव्ये पाहिली, तर तुषार गांधी कोणत्या बाजूने सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवतात, हा प्रश्नच पडावा. स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे गांधी प्रत्यक्षात मात्र राजकीय कार्यकर्ते असल्यासारखे वर्तन करतात. सभांना हजेरी लावतात, पक्षांचा प्रचार करतात. त्यामुळे हा सामाजिक कार्यकर्त्याचा पांघरलेला मुखवटा हळूहळू उतरण्यास सुरुवात झाली आहे. लोकं आता जागी झालेली आहेत, त्यांना केवळ आडनावात ‘गांधी’ आहे म्हणून वेडं बनविण्याचे दिवस राहिलेले नाही. ‘गांधी’ नावाचा आधार घेणारे राहुल, सोनिया गांधी यांच्या काँग्रेसची अवस्था वेगळी सांगायला नको. त्यामुळे तुषार गांधी यांनी आतातरी सारासार विचार करून महात्मा गांधींचा वारसा पुढे चालवावा. काँग्रेसची ओझी वाहण्यात आपली ताकद वाया न घालवलेली बरी!
 
युवराज आणि स्थगिती
 
विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून सत्ताधार्‍यांवर शेलक्या शब्दांत टीका करताना आदित्य ठाकरेंना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यातून राजकीय अपरिपक्वता आणि थिल्लरपणा यांचे सचित्र दर्शनच घडले. ‘गद्दार’, ‘50 खोके...’ असा परिपाठ सुरू केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून त्यांनी टोमणेबाजी सुरू केली. त्यांची नक्कल करण्यातही आदित्य एकदम तरबेज झाले. सोबत अदानी आणि अंबानी यांच्यावरही टोमणेबाजी सुरूच होती. पण, त्यांच्याच बंधूंचे अनंत अंबानींच्या लग्नात गाण्यांवर ठुमके लगावत असताना अंबानीप्रेम तर उतू चालले होते. असो. आता युवराजांनी नेहमीप्रमाणे एक गंजलेली आणि वारंवार कानावर पडलेली नवी टूम काढली आहे. ही टूम इतकी जुनी आहे की, अनेकांना तोंडपाठही झाली असावी. पुन्हा एकदा आदित्य यांनी वसईतील सभेत पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील एक हजार, 600 एकर जागा अदानींच्या घशात घालण्याचा महायुती सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. या बोथट आरोपाला ना कशाचा आधार आणि ना कशाचा पुरावा. एक हजार, 600 एकर म्हणजे एक हजार, 600 चौरस फूट वाटले का युवराजांना. असो, एकदा उद्धव ठाकरे यांनी मुंबईवर नऊ किमी उंचीचा ढग असल्याचेही म्हटले होतेच की! त्यामुळे युवराजांनी सांगितलेली गोष्टही केवळ हास्यविनोदापुरतीच महत्त्वाची आहे. धारावीचे पुनर्वसन रोखण्यासाठी धारावीकरांना संभ्रमात पाडून उबाठा गटाने अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली. मात्र, फायदा शून्य. धारावीकरांनी सर्वार्थाने पुनर्विकासाला आपली सहमती दर्शविली आहे.
 
त्यामुळे धारावीचे एक नवे आणि भव्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. मात्र, या ना त्या कारणाने भ्रमित करायचे हा नित्यनेम आदित्य ठाकरे पार पाडत आहेत. वडील मुख्यमंत्री असताना तत्कालीन सरकारला ठाकरे सरकार नाही, तर ‘स्थगिती सरकार’ असे म्हटले जायचे हे आदित्य विसरले बहुधा. विविध महामंडळांवरील नियुक्त्या, आर्थिक अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना दिली जाणारी मदत थांबविली. 50 टक्के पूर्ण झालेले ‘मेट्रो 3’ आरे कारशेडचे काम, जलयुक्त शिवारची कामे, बुलेट ट्रेन अशा अनेक महत्त्वपूर्ण कामांना ठाकरे सरकारने स्थगिती दिली. केवळ सुडाच्या भावनेने स्थगिती दिली गेली, अखेर जनतेनेच या स्थगिती सरकारला कायमची स्थगिती दिली.
 
Powered By Sangraha 9.0