नवी दिल्ली(Supreme Court on Shiv Sena Symbol): शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि अधिकृत पक्षाचे नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे.या प्रकरणासंदर्भातील अंतरिम दिलासासाठी दाखल केलेल्या याचिकेवर न्या.सूर्यकांत आणि न्या. जयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर सोमवार, दि.१४ जुलै रोजी सुनावणी झाली आहे. या याचिकेत येणाऱ्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी काही तात्पुरता दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय दिला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हा निर्णय अन्यायकारक असल्याचे नमूद करत, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
या सुनावणीत खंडपीठासमोर वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे यांची बाजू मांडत, अंतरीम दिलासासाठी विनंती केली. मात्र, न्या. कांत यांनी स्पष्टपणे सुचवले की, “मुख्य प्रकरणाचा अंतिम निर्णय घेणे हाच एकमेव उपाय आहे. आम्ही ऑगस्टमध्ये कुठे तरी यासाठी वेळ राखू.” खंडपीठाने संध्याकाळपर्यंत सुनावणीची तारीख निश्चित करून कळवली जाईल,असे आश्वासन कपिल सिब्बल दिले.
खंडपीठ या प्रकरणात निवडणूक कायदे, पक्ष नोंदणीसंबधीचे कायदा आणि पक्षातंर बंदी कायद्याचा सखोल विचार करून ऑगस्ट महिण्यात निर्णय देतील, अशी आशा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना आहे. शिवसेनेच्या चिन्हावरील अंतिम निर्णयासाठी आता सर्वांचे लक्ष ऑगस्टमधील सुनावणीकडे लागले आहे. हा निर्णय ऐन महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक निवडणूकीच्या मुहूर्तावर येईल की, पुन्हा सुनावणीची तारिख पुढे ढकलली जाईल, हे पुढील सुनावणीतच माहित होणार.