बार्टीतर्फे अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

14 Jul 2025 17:30:55


पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने अनुसूचित जातीतील युवक आणि युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे. प्रशिक्षण शिबिरे नाशिक जिल्ह्यातील मोहाडी तालुका दिंडोरी येथील सह्याद्री फार्म्स टाटा स्ट्राईव्ह कौशल्य विकास केंद्रात आयोजित करण्यात आली आहेत. उपलब्ध प्रशिक्षणांमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यशाळा, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, जनरल ड्युटीअसिस्टंट, फील्ड टेक्निशियन एसी आणि सोलर पी व्ही इंस्टॉलर यांचा समावेश आहे. प्रशिक्षणासाठी पात्रता ७ वी, १०वी पास ते १२ वी उत्तीर्ण अशी असून अर्ज करण्यासाठी वयमर्यादा १८ ते ३५ वर्षे ठेवण्यात आली आहे. हे सर्व प्रशिक्षण मोफत असून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र, व्यवसाय मार्गदर्शन, संगणक प्रशिक्षण, कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण तसेच शंभर टक्के नोकरीसाठी सहाय्य दिले जाणार आहे. अर्ज करताना शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा किंवा महाविद्यालयाचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड आणि आवश्यक छायांकितप्रती जोडणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर www.barti.in येथे भेट देऊन माहिती घ्यावी तसेच https://rb.gy/19c4ga या लिंकवरून ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी ७०६६२०६९२८, ९१८६२३६१४१, ९१८६२३६१८८, ७०३०२०५४६७ या संपर्क क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0