पुढील अधिवेशनात गोहत्या बंदी विधेयक येणार! - राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर माहिती; गोमांस तस्करीची पाळेमुळे खाणून काढण्यासाठी विशेष तपासणी पथकाची नियुक्ती

14 Jul 2025 19:21:27

मुंबई, गोहत्या आणि गोमांस तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार आगामी अधिवेशनात गोहत्या बंदी विधेयक मांडणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. तसेच गोमांस तस्करीच्या प्रकरणांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) स्थापना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. भोयर यांनी ही माहिती दिली. वारंवार गोतस्करी करणाऱ्या आरोपींवर 'मकोका' अंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच, एखादा आरोपी तीन वेळा गोतस्करी करताना आढळल्यास त्यावर 'मकोका' निश्चितपणे लागू केला जाईल, असे आश्वासन डॉ. भोयर यांनी सभागृहाला दिले.

लोणावळ्याजवळील एका घटनेचा संदर्भ देताना डॉ. भोयर यांनी सांगितले की, दि. २५ मार्च २०२५ रोजी भाग्यनगर (हैदराबाद) येथून जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), मुंबईच्या दिशेने निर्यातीसाठी नेण्यात येणारे ५७ टन गोमांस दोन कंटेनर ट्रकमधून जप्त करण्यात आले होते. 'मे. एशियन फुड्स मीम ॲग्रो' या भाग्यनगरमधील आस्थापनेकडून हे गोमांस नेले जात होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित आस्थापनेचा परवाना रद्द करण्यासाठी केंद्र सरकारच्या 'अ‍ॅपेडा' (कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीसाठी प्राधिकरण) या संस्थेकडे विनंती करण्यात आली आहे.

या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपासणी पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. भोयर यांनी केली. या प्रकरणात दोन आरोपी असून, एका आरोपीला अटक केल्यानंतर त्याला जामीन मिळाला आहे, तर दुसऱ्या आरोपीला अटक करण्याची कारवाई सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गोमांसची वाहतूक आणि विक्री होणे निंदनीय असून, यात स्थानिक पोलीस प्रशासनातील अधिकारी सहभागी आहेत का, याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोरक्षकांवरील गुन्हे मागे घेणार

- विधान परिषदेत गोहत्या आणि गोमांस तस्करीच्या मुद्द्यावर झालेल्या चर्चेत विविध सदस्यांनी सहभाग घेतला. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी ५७ टन गोमांस पकडणे हे गृहखात्याचे अपयश असल्याचे म्हटले. हे मोठे रॅकेट असून, गोवंश हत्या बंदी कायद्याचे संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. यावर तातडीने कारवाईची मागणी परब यांनी केली.

- आमदार श्रीकांत भारतीय यांनी राज्यातील अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली. तसेच, गोरक्षकांवर दाखल झालेले विनाकारण गुन्हे मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली.

- यावर उत्तर देताना डॉ. भोयर यांनी सांगितले की, २०२२ ते २०२५ या कालावधीत गोहत्या आणि गोमांस तस्करी प्रकरणी २,८४९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४,६७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- या कालावधीत १,७२४ टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. यासोबतच, स्वयंस्फूर्तीने सामाजिक कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर दाखल झालेले गुन्हे अभ्यासून ते मागे घेण्याची कारवाई केली जाईल, अशी हमी डॉ. भोयर यांनी सभागृहाला दिली.


Powered By Sangraha 9.0