मुंबई : महाराष्ट्र महसूल सेवेतील १२ अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले असून त्यांना आयएएसचा दर्जा प्राप्त झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
"महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने अधिसूचना जारी केली. महाराष्ट्र महसूल सेवेतील बारा अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले," अशी माहिती देत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
ते म्हणाले की, "महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्वअधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून, महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो. उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो," असेही ते म्हणाले.
पदोन्नती मिळालेले १२ अधिकारी पुढीलप्रमाणे :
१) विजयसिंह देशमुख
२) विजय भाकरे
३) त्रिगुण कुलकर्णी
४) गजानन पाटील
५) महेश पाटील
६) पंकज देवरे
७) मंजिरी मनोलकर
८) आशा पठाण
९ राजलक्ष्मी शहा
१०) सोनाली मुळे
११) गजेंद्रबावणे
१२) प्रतिभा इंगळे