मोठी बातमी! यूएलएफएच्या कॅम्पवर भारतीय सैन्याचा ड्रोन हल्ला केला?

13 Jul 2025 19:27:56

नवी दिल्ली(Drone Strike on ULFA): नक्षलवादी संघटना यूएलएफए(आय) (United Liberation Front of Assam-Independent) च्या म्यानमारमधील काही शिबीरांवर भारतीय सैन्याने ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाल्याचा आणि १९ जण जखमी झाल्याचा दावा यूएलएफएने केला आहे.

यूएलएफएच्या म्हणण्यानुसार, भारतीय सैन्य दलाने ड्रोनच्या माध्यमातून एनएससीएन(National Socialist Council of Nagaland) च्या शिबीरांनाही लक्ष्य केले. मात्र, भारतीय सैन्य दलाने यूएलएफएचा हा दावा पूर्णतः फेटाळून लावला आहे. भारतीय सैन्य दलाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट सांगितले की, “आम्हाला अशा कोणत्याही हल्ल्याची माहिती नाही. भारतीय सैन्याने अशा प्रकारचे कुठलेही ऑपरेशन केलेले नाही.”

यूएलएफचा इतिहास नेमका काय आहे?
परेश बरुआ यांच्या नेतृत्वाखाली १९७९ मध्ये स्थापन झालेली यूएलएफएही आसाममध्ये कार्यरत असलेली एक नक्षलवादी संघटना आहे. या संघटनेचा उद्देश आसामसाठी स्वतंत्र सत्ता स्थापनेचा आणि स्वयंभू राज्य निर्माण करण्याचा होता. या संघटनेने दीर्घकाळ हिंसक आणि सशस्त्र कारवाया केल्या असून, १९९० मध्ये केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली. त्यानंतरही या संघटनेविरोधात भारतीय सैन्याने अनेक वेळा विशेष ऑपरेशन्स राबवले. २००८ मध्ये यूएलएफएचा प्रमुख नेता अरबिंद राजखोवा याला बांग्लादेशमध्ये अटक करून भारताच्या ताब्यात देण्यात आले होते. या संघटनेच्या हिंसक कारवायांमुळे एकवेळी तर आसाममधील अनेक चहाचा व्यापार करणाऱ्या उद्योगपतींनी राज्य सोडण्याचा निर्णय घेतल्याची घटना घडली होती.



Powered By Sangraha 9.0