नवी दिल्ली(Crushed by car ): राजधानी दिल्लीतील वसंत विहार परिसरात ९ जुलै रोजी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. शिवा कॅम्पजवळ फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना एका भरधाव पांढऱ्या ऑडी कारने चिरडले. या अपघातात आठ वर्षांच्या मुलीसह पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना पहाटे इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चालक उत्सव शेखर हा द्वारकेचा रहिवासी आहे. तो नोएडाहून द्वारकेला परतत असताना मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची गाडी जप्त केली आहे.
सदर घटनेची साक्षीदार असलेल्या एका महिलेने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सुमारे १५ जण फुटपाथवर झोपले होते. अचानक पांढऱ्या रंगाची ऑडी भरधाव वेगाने आली आणि थेट झोपलेल्या लोकांवर घुसली. अपघातानंतर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कार पुढे जाऊन ट्रकला जोरदार धडकली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.
जखमींची ओळख पटली!
पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमी राजस्थानचे रहिवासी असून ते मजुरी व भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात. जखमींमध्ये लाधी (४०), त्याची आठ वर्षांची मुलगी बिमला, पती सबमी उर्फ चिरमा (४५), रामचंदर (४५) आणि त्याची पत्नी नारायणी (३५) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून कार आणि चालकाला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे, खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार “जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.घटनेची सखोल चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. अपघाताच्या वेळी नेमके काय झाले, हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.”