नवी दिल्ली(Nominated Rajya Sabha Member): भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांनी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळचे शिक्षक आणि भाजप नेते सी. सदानंदन मास्टर तसेच इतिहासकार मीनाक्षी जैन यांना राज्यसभेसाठी शनिवार, दि.१२ जुलै रोजी जारी केलेल्या राजपत्रात या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
राज्यसभेतील नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त जागा भरण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. राज्यसभेत राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि इतर क्षेत्रांतील एकूण १२ व्यक्तींना राष्ट्रपती नामांकित करू शकतात. सध्या त्यातील चार जागा रिक्त होत्या.
हर्षवर्धन श्रृंगला हे माजी परराष्ट्र सचिव असून त्यांनी अमेरिका, बांगलादेश आणि थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही काम पाहिले आहे. २०२३ मध्ये भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या वेळी ते मुख्य समन्वयक होते.
कायदेक्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्ती उज्ज्वल निकम यांनी २६/११ मुंबई हल्ल्याच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते.
सी. सदानंदन मास्टर हे केरळमधील भाजप नेते असून १९९४ मध्ये सीपीआय (एम) च्या संशयास्पदी हल्ल्यात त्यांनी दोन्ही पाय गमावले होते. यानंतर त्यांनी आपले शिक्षण क्षेत्रातील कार्य सुरूच ठेवले. त्यांना पक्षाकडून ‘जिवंत शहीद’ अशी पदवी देण्यात आली आहे.केरळ विधानसभा निवडणुकीत कुथुपरम्बू मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. सी. सदानंदन यांनी राष्ट्रीय शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते आणि ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या थिंक टँक, भारतीय विचार केंद्रमचे सक्रिय सदस्य आहेत.
इतिहासकार मीनाक्षी जैन या दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी महाविद्यालयात इतिहासाच्या माजी प्राध्यापिका आहेत. त्या ऐतिहासिक संशोधनासाठी ओळखल्या जातात. त्यांनी ‘मध्ययुगीन भारत’ या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांची अलीकडील पुस्तक, "राम आणि अयोध्या", हे अयोध्या रामजन्मभुमीवरचे एक महत्त्वाचे पुस्तक म्हणुन गिनल्या जात आहे. त्या टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक गिरीलाल जैन यांची कन्या आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर शुभेच्छा देताना चौघांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.