
मुंबई : 'सध्याचे युग राष्ट्र आणि धर्माचे आहे. हे सनातनचे युग आहे. जर कोणी सनातनचा नाश करण्याबद्दल बोलत असेल आणि देशात सत्ता मिळवण्याबद्दलही बोलत असेल, तर तसे चालणार नाही.' असे म्हणत कल्कीधामचे मुख्य पुजारी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे दिसतेय. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका खाजगी कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात सध्या कावड यात्रेचा विषय प्रकाशझोतात असून त्यावरुनविरोधकांचे राजकारण होताना दिसतेय. आचार्य प्रमोद कृष्णम पुढे म्हणाले, इतरांना सल्ला देण्याऐवजी अखिलेश यादव यांनी प्रथम स्वतः कावड्यांची सेवा करावी आणि सावन महिन्यात ते किती कावड्यांचे पाय मालिश करतील याबाबत सांगावे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कावड्यांवर फुले वृष्टी करण्याचे काम करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, ते उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी कावड्यांचे भक्तीभाव मानले.
पुढे ते म्हणाले, अखिलेश यादव यांचे कुटुंब थोडे धार्मिक आहे. मी त्यांच्या कुटुंबाचा आदर करतो, परंतु अखिलेश यादव परदेशी संस्कृतीने प्रभावित आहेत. जर अखिलेश यादव यांना खरोखरच त्यांचा पक्ष मजबूत करायचा असेल तर त्यांना लोकांची मने जिंकावी लागतील आणि सर्वांचा आदर करावा लागेल. समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र आहे. सनातनमध्ये फूट पाडण्याचे षड्यंत्र यशस्वी होणार नाही.