अयोध्येतील 'शेषावतार मंदिर' ८० टक्के पूर्ण! - लवकरच गर्भगृहात लक्ष्मणजींचे दर्शन घेता येणार

12 Jul 2025 18:31:27

मुंबई :
अयोध्येच्या श्रीराम मंदिर परिसरात उभारण्यात येत असलेल्या शेषावतार मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. मंदिराच्या शिखरावर कलशाची स्थापना झाल्यानंतर ध्वजदंडही नुकताच स्थापित करण्यात आला. शेषावतार मंदिर लक्ष्मणजींना समर्पित असून येणाऱ्या भाविकांना लवकरच गर्भगृहात लक्ष्मणजींचे अद्भुत दर्शन घेता येणार आहे. शेषावतार हे लक्ष्मणजींचेच एक अवतार मानले जातात. म्हणूनच श्रीराम जन्मभूमी परिसरातील सर्वात उंच स्थळी शेषावतार मंदिर उभारले जात आहे.

अशी माहिती आहे की, ज्या चबुतऱ्यावर श्रीरामलला विराजमान आहेत त्या श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या गर्भगृहाच्या चबुतऱ्याइतकीच उंची शेषावतार मंदिराच्या गर्भगृहाच्या चबुतऱ्याची ठेवण्यात आली आहे. या चबुतऱ्यावर पांढऱ्या संगमरवराच्या दगडांतून शेषावतार लक्ष्मणजींची मूर्ती साकारण्यात आली आहे.

श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, शेषावतार मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. गेल्या बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते शिखर कलश व ध्वजदंड पूजन करण्यात आले होते. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना या मंदिरांचेही दर्शन घेता यावे, यासाठी ट्रस्ट विचार करते आहे.



Powered By Sangraha 9.0