
मुंबई : मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल करणे संजय राऊतांना चांगलेच महागात पडले आहे. संजय राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा मंत्री शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचे सगळे प्रकार उघड केल्यानंतर त्यांना पळता भुई थोडी होईल, असेही ते म्हणाले.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "काल संजय राऊतांसारख्या महान पत्रकाराने त्यांच्या अकलीचे धिंडवडे काढून माझा एक व्हिडीओ व्हायरल केला. माझ्या बेडरूममधील तो मॉर्फ केलेला व्हिडीओ आहे. बदनामी करण्यासाठी ते इतक्या नीच पातळीवर उतरू शकतात हे आम्ही राजकारणात पहिल्यांदा पाहिले आहे. अनेकवेळा राजकीय पुढाऱ्यांवर भ्रष्टाचारासह इतर आरोप केले जातात. परंतू, अशा प्रकारचे आरोप करणारे हे महाभाग असेच असू शकतात. त्यामुळे राजकीय नितीमत्ता नसलेल्या लोकांना धडा शिकवला पाहिजे. त्यांचे चारित्र्य आपल्याला माहिती आहे. त्यांनी स्वप्ना पाटकर यांच्याबद्दल काय काय वक्तव्य केले याबद्दलचा व्हिडीओ पाहिल्यास त्यांची लायकी काय आहे ते लक्षात येईल. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार चरित्रहनन केल्याबद्दल मी त्यांना एक अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार आहे. त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. कायद्याच्या चौकटीत मी त्यांना नोटीस पाठवणार असून त्यांनी उत्तर न दिल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे," असा इशारा त्यांनी दिला.
...तर त्यांना पळता भुई थोडी होईल!
"या सगळ्या दलालांची एक एक गँग महाराष्ट्रमध्ये कार्यरत आहे. त्यांचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. परंतू, त्या खालच्या राजकारणात मला जायचे नाही. आता त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे. त्यांनी कशा सरकारी बंगल्यात पार्ट्या केल्या त्याचेसुद्धा व्हिडीओ काढावे लागतील असे मला वाटते. मी यांचे सगळे प्रकार उघड केल्यानंतर त्यांना पळता भुई थोडी होईल," असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.