रोहित पवारांना धक्का! ईडीकडून आरोपपत्र दाखल; म्हणाले, "विचारांसाठी कितीही..."

12 Jul 2025 12:46:22


मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा तसेच शिखर बँक घोटाळा प्रकरणातही रोहित पवार याचे नाव आल्याचा ईडीचा आरोप आहे. तसेच रोहित पवार यांनी बारामती अ‍ॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यावर रोहित पवार म्हणाले की, "कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईलच. विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे. महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे," असे ते म्हणाले.




Powered By Sangraha 9.0