बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांची दुर्दशा, ब्रिटिश खासदारांची तीव्र प्रतिक्रिया! - युनूस सरकारविरोधात कडक कारवाईची मागणी

12 Jul 2025 18:58:04

मुंबई : मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेशची सद्यस्थिती पाहता हिंदू अल्पसंख्याकांवर अद्याप हल्ले होत आहेत. दक्षिण आशियाई देशातील हिंदू अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेशातील युनूस सरकार विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी अनेक प्रमुख ब्रिटिश राजकीय नेते, माजी आणि विद्यमान खासदार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला केली आहे. कन्झर्व्हेटिव्ह फ्रेंड्स ऑफ बांगलादेश (सीएफओबी) आयोजित एका चर्चासत्रात बांगलादेशात हिंदू विरोधी घडलेल्या हिंसक घटनांना अधोरेखित करण्यात आले.

चर्चासत्राचे उद्घाटन सीएफओबीच्या अध्यक्षा अंजेनारा रहमान-हक यांनी केले व याचे अध्यक्षपद हॅरो ईस्टचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी भूषविले. यावेळी सांगण्यात आले की, बांगलादेशच्या आर्थिक विकासात आणि राजकीय स्थिरतेत हिंदू अल्पसंख्याकांचे मोठे योगदान आहे, त्यामुळे त्यांना राजकारणात प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. जेणेकरून अल्पसंख्याकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि न्याय, शांतता आणि सौहार्द प्रस्थापित होईल.

बांगलादेशातील हिंदू दहशतीत जगत असल्याचे युनायटेड हिंदू अलायन्स ऑफ ब्रिटनचे हराधन भौमिक यांनी सांगितले. यूके बौद्ध समुदायाचे प्रतिनिधित्व करताना, बॅरिस्टर प्रशांत बरुआ यांनी बांगलादेशातील समाजाच्या कट्टरपंथीकरणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि मलेशियामध्ये ३६ बांगलादेशी अतिरेक्यांना अटक केल्याचाही उल्लेख केला. ढाक्यातील हुजी च्या कार्यकर्त्यांच्या हालचाली बांगलादेशात कट्टरपंथी शक्तींची वाढती उपस्थिती दर्शवतात आणि युनूस सरकार त्यांच्याविरुद्ध कोणतीही गंभीर कारवाई करत नाही. चितगाव हिल ट्रॅक्समध्ये स्थानिकांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबद्दलही बरुआ यांनी भीती व्यक्त केली.





Powered By Sangraha 9.0