मुंबईचा 'डीएनए' हिंदूंचा, पालिकेत फक्त भगवे बसणार! मंत्री नितेश राणे; हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची गरज

11 Jul 2025 16:48:03

मुंबई : "मुंबईचा डीएनए हिंदूंचा आहे आणि मुंबई महानगरपालिकेत फक्त भगवे बसतील", असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी व्यक्त केले. ते म्हणाले, "मला हिंदूंनी मतदान केले आहे, त्यामुळे मी त्यांचीच बाजू घेईन. हिंदू म्हणून एकत्र येणे ही काळाची गरज आहे."

नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी बोरीवली येथील ‘रो-रो जेट्टी (फेज १)’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, महायुती सरकारच्या काळात जाहीर झालेली सर्व कामे पूर्ण होत आहेत. या रो-रो बोट सेवेमुळे प्रवाशांना गाड्यांसह प्रवास करता येईल आणि पूर्वीचा १ तास ३० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटांत पूर्ण होईल. या प्रकल्पाचे भूमिपूजन आणि उद्घाटन दोन्ही महायुती सरकारच्या काळात होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

खा. संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत जनतेचा दबाव असल्याचे म्हटले होते. त्यावर राणे म्हणाले, "महाराष्ट्रातील जनता आमच्याबरोबर आहे. आम्हाला पाकिस्तानच्या जनतेने निवडून दिलेले नाही." पंढरपूर येथील एका सुरक्षारक्षकाने भक्ताला मारहाण केल्याच्या घटनेवर ते म्हणाले, "भक्तांवर हात उगारणाऱ्यांवर कारवाई होईल, मी स्वतः याची चौकशी करेन."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, "मराठीवर इतके प्रेम असेल, तर उद्यापासून अजान मराठीत करा आणि सर्व मदरशांमध्ये उर्दू बंद करून मराठी सक्ती करा. मग तुमचे मराठी प्रेम दिसेल." छांगूर बाबा धर्मांतर प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले, "छांगूर बाबाचा निपटारा करण्यासाठी उत्तर प्रदेशचे योगीजी पुरेसे आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील अनुयायी आमच्यावर सोडा, आम्ही त्यांना पुरेसे आहोत", असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0