कॅनडा : कॅनडामधील सरे शहरात नुकतंच सुरु झालेलं अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मा यांचं 'कॅप्स कॅफे' दहशतीच्या सावटाखाली आलं आहे. बुधवारी रात्री स्थानिक वेळेनुसार एका अनोळखी व्यक्तीने कॅफेच्या खिडकीवर किमान ९ गोळ्या झाडल्या. या घटनेची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डी याने घेतली असून, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
कॅफेने सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत म्हटलं आहे की, "आम्ही अजूनही या धक्क्यातून सावरत आहोत, पण हार मानत नाही. आम्ही हा कॅफे आनंद, प्रेम आणि समुदायासाठी उभारला होता. या स्वप्नात हिंसा शिरली, हे मनाला वेदनादायक आहे. पण आमचं ध्येय तेच आहे शांततेचा प्रसार." ही घटना कपिल शर्माच्या कॉमेडी शोमधील एका विनोदी भागाशी जोडली जात आहे. हरजीत लड्डीने आरोप केला आहे की, ‘द कपिल शर्मा शो’मधील एका प्रसंगात निहंग सिखांच्या वेशभूषेचा अपमान केल्याने त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळेच हा हल्ला केल्याचा दावा त्याने सोशल मीडियावर केला आहे.
हरजीत लड्डी हा भारतातील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सर्वाधिक शोधात असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक आहे. तो खलिस्तानी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’शी संबंधित आहे. कॅनडामधील स्थानिक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला असून, कपिल शर्माच्या सुरक्षेचाही आढावा घेतला जात आहे. 'कॅप्स कॅफे’ने सरे आणि डेल्टा पोलिसांचे आभार मानले असून, "त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली," असं त्यांनी नमूद केलं आहे.
कॅफेवरील या हल्ल्यानंतर कॅनडातील भारतीय समुदायात चिंतेचे वातावरण आहे. सोशल मीडियावर #SupportKapsCafeCanada या हॅशटॅगखाली कपिल शर्मा आणि त्यांच्या टीमला पाठिंबा दर्शवला जात आहे. अनेक चाहत्यांनी ही घटना निंदनीय असल्याचं म्हटलं असून, अशा दहशतीपुढे झुकू नका, असा संदेशही दिला आहे.