सागरी कंटेनरच्या जगात

11 Jul 2025 21:50:25

जगभरात ६५ दशलक्ष कंटेनर सक्रिय वापरात असून, प्रामुख्याने भाडेपट्टा कंपन्यांद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. हे कंटेनर शिपिंग उद्योगाचा आधारस्तंभ बनले आहेत. सागरी मालवाहतुकीचे प्रमाण सामान्यतः मेट्रिक टन किंवा TEUs (२० फूट समतुल्य युनिट्स) मध्ये मोजले जाते, जे २० फूट कंटेनरच्या लांबीवर आधारित असते. हे युनिट कंटेनरची क्षमता, कंटेनर जहाज किंवा टर्मिनलची क्षमता मोजण्यासाठी एक प्रमाण आहे. सागरी वाहतूक आणि साठवणुकीसाठी अनेक प्रकारचे कंटेनर वापरले जातात. प्रत्येक कंटेनर वेगवेगळ्या प्रकारच्या मालवाहतुकीसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे आंतरराष्ट्रीय शिपिंग कार्यक्षम आणि सुरक्षित केले गेले आहे. यानिमित्ताने शिपिंग कंटेनरच्या जगाचा आढावा घेऊया.

दरवर्षी अंदाजे ११ अब्ज टन माल समुद्रमार्गे वाहून नेला जातो आणि सागरी वाहतुकीची मागणीही दिवसेंदिवस वाढतेच आहे. २०२८ साली ती १६ अब्ज टनांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या एकूण व्यापाराच्या ९० टक्के मालाची वाहतूक समुद्रमार्गे केली जाते आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त कंटेनरमध्ये भरली जाते. सर्वांत पहिले मालवाहू जहाजे मोठ्या प्रमाणात माल वाहून नेण्यासाठी बांधली गेली होती. बहुतेक सामान्य मालवाहू जहाजांमध्येही युनिट कार्गो ठेवण्यासाठी, लाकडी कंटेनर किंवा बॉस वापरले जात होते. परंतु, मोठ्या प्रकारच्या कार्गोचा समावेश करून कॉम्पॅट, नाजूक आणि वाहतुकीदरम्यान विशेष काळजी घेणार्‍या कार्गोसाठी कंटेनर योग्य मानले गेले. म्हणूनच, विशेष प्रकारच्या जहाजांची रचना करण्याची आवश्यकता भासू लागली. यामध्ये केवळ जहाजे फक्त या कंटेनरने भरली जाऊ शकत नाहीत, तर कंटेनरमधील सामग्रीची स्थितीदेखील सुरक्षित राखू शकतील अशी रचना करण्यात आली. कंटेनर वाहतुकीमध्ये प्रमाणित आणि पुन्हा सील करण्यायोग्य वाहतूक बॉसमध्ये माल वाहतूक केली जाते. जगभरातील ९० टक्के नॉन-बल्क कार्गो कंटेनरद्वारे वाहून नेला जातो हे लक्षात घेता, महासागरांमधून माल वाहतूक करण्यासाठी कंटेनर शिपिंगला सर्वाधिक पसंती मिळते.

‘ड्राय कंटेनर’ हे मानक आणि सर्वाधिक वापरले जाणारे कंटेनर आहे. ते बंद आणि हवामानरोधक आहे. सामान्य माल, कोरडा माल आणि उत्पादित वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा कंटेनर वापरात येतो. तर तापमान नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज रेफ्रिजरेटर कंटेनर फळे, भाज्या, औषधे आणि काही रसायने यांसारख्या नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरले जातात. ‘फ्लॅट रॅक कंटेनर’ या प्रकारच्या कंटेनरमध्ये छप्पर नसते. यामुळे यंत्रसामग्री, वाहने आणि मोठी उपकरणे यांसारख्या मोठ्या आकाराच्या किंवा अनियमित आकाराच्या कार्गोची वाहतूक करता येते. टँक कंटेनर हे कंटेनर द्रव किंवा वायूयुक्त माल जसे की, रसायने, इंधन आणि अन्न-दर्जाच्या उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. खुले किंवा पुरेसे वायुविजन प्रणाली असलेले हवेशीर कंटेनर, विशिष्ट कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वापरले जातात. ‘इन्सुलेटेड थर्मल कंटेनर’ हे तापमान नियंत्रण आवश्यक असलेल्या परंतु, आवश्यकतेनुसार रेफ्रिजरेशन नसलेल्या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरले जातात. हे कंटेनर तापमान चढ-उतारांपासून मालाचे संरक्षण करतात. ओपन साईड कंटेनर या कंटेनरमध्ये सर्व बाजूंनी प्रवेश दरवाजे असतात. ज्यामुळे माल सहजपणे लोड करणे आणि उतरवणे शय होते. प्लॅटफॉर्म कंटेनर हे बाजू किंवा छप्पर नसलेला एक साधा कंटेनर आहे. जो जड, मोठ्या आकाराचा किंवा विचित्र आकाराचा माल वाहून नेण्यासाठी वापरला जातो.

प्रत्येक कंटेनर विशिष्ट उद्देशांसाठी काम करतो आणि समुद्र ओलांडून विविध वस्तूंच्या कार्यक्षम आणि सुरक्षित वाहतुकीसाठी परवानगी देतो. एखाद्या व्यापार्‍याला कोणत्या प्रकारच्या मालवाहतुकीला कंटेनर पाठवायचे आहे, यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे कंटेनर प्रदान करतात. हे कंटेनर २० फूट, ४० फूट, ४५ फूट आणि ५३ फूट इंटरमॉडल कंटेनरच्या मानक आणि उच्च घन आकारात असतात. संपूर्ण शिपिंग उद्योगात कंटेनर हे कार्गो शिपिंगचे एक आवश्यक साधन आहे. जागतिक व्यापाराचा फायदा करून घेण्यासाठी, योग्य प्रकारचा कंटेनर निवडता येतो. आंतरराष्ट्रीय शिपिंगसाठी वापरल्या जाणार्‍या सर्व प्रकारच्या कंटेनरमुळे वाहतूक व्यवहार्य आणि कार्यक्षम होते.
Powered By Sangraha 9.0