‘पिस्को' जीआय टॅगच्या वादाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रेडमार्क आणि जीआय मधील फरक केला स्पष्ट

11 Jul 2025 19:27:48

नवी दिल्ली(Controversy on Pisco GI Tag): 'पिस्को’ या अल्कोहोलिक पेयाच्या भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय (Geographical Indication - GI) टॅगच्या नोंदणीसंदर्भातील वादात दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ‘जीआय कायदा, १९९९’ आणि ‘ट्रेडमार्क कायदा,१९९९’ मधील मुलभूत फरक स्पष्ट केला आहे. पेरू आणि चिली या दोन दक्षिण अमेरिकन देशांमधील संघटनांदरम्यान सुरू असलेल्या जीआय हक्कांवरील संघर्षावर सुनावणी करताना, जीआय आणि ट्रेडमार्क कायद्याचे स्वरूप आणि हेतू पूर्णत: भिन्न असल्याचे उच्च न्यायालयाने या प्रकरणात अधोरेखित केले आहे.

‘एसोसिएशन डी प्रोडक्टोरेस डी पिस्को ए.जी. विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या प्रकरणात, पेरुव्हियन संघटनेने ‘पिस्को’ नावावर दावा केला होता, आणि चिलीने त्या दाव्याला विरोध केला होता. परंतु या प्रकरणात न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे की, “जीआय कायदा देशाच्या ऐतिहासिक किंवा राजकीय घटनांशी संबंधित नाही. तर उत्पादनाचे भौगोलिक स्थान आणि त्याच्याशी संबंधित सांस्कृतिक किंवा औद्योगिक बाबी महत्त्वाच्या असतात.

‘जीआय कायदा’ आणि ‘ट्रेडमार्क कायदा’ या दोन्हींमधील मुलभूत फरक स्पष्ट करत न्यायालयाने म्हटले की, “ट्रेडमार्क हा एखाद्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा खासगी हक्क असतो, तर जीआय हा विशिष्ट प्रदेशातील उत्पादकांचा सामूहिक हक्क असतो. ट्रेडमार्क निवडला, हस्तांतरित किंवा परवाना दिला जाऊ शकतो. मात्र जीआय अशा प्रकारे हस्तांतरित केला जाऊ शकत नाही. त्यामुळे, पूर्वीच्या वापर, सद्भावना किंवा अप्रामाणिक दावा या ट्रेडमार्क संदर्भातील संकल्पना जीआय कायद्यात लागू होत नाहीत.”

उच्च न्यायालयाने असेही नमूद केले की, “जीआय कायदा कोणत्याही सामाजिक, राजकीय किंवा ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून, फक्त उत्पादनाच्या मूळ भौगोलिक ठिकाणाशी संबंधित असतो. त्यामुळे, IPAB चा 'पिस्को' चा चिलीमधील वापर हा अप्रामाणिक असल्याचा निष्कर्ष चुकीचा आहे.

उच्च न्यायालयाने पुढे इंटेलेक्चुअल प्रोपर्टी अपीलेट बोर्ड (IPAB) च्या निर्णयात हस्तक्षेप करत पेरू देशाच्या भारतातील पिस्को’(Pisco) ब्रॅन्डला ‘पेरू’ हे उपनाम जोडण्याचे निर्देश दिले आहे. आता पेरूचा ‘पेरू पिस्को’ हा जीआय टॅग चिलीयन ‘पिस्को’ पासून वेगळा झाला आहे.

जीआय टॅग कायद्याच्या दृष्टिकोनातून
न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, “जीआय कायदा हा ट्रेडमार्कच्या मापदंडावर नसतो. जीआय नोंदणीचा विचार करताना उत्पादन चाचणी त्या प्रदेशात उत्पादित होते का? त्या प्रदेशाशी संबंधित विशिष्ट प्रतिष्ठा, गुणधर्म किंवा वैशिष्ट्य त्याला लाभले आहे का? हे मुख्य निकष जीआय नोंदणीसाठी महत्वाचे आहे.” अशा प्रकारे न्यायालयाने या प्रकरणाच्या निरीक्षणात नमूद केले आहे.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने पेरू आणि चिली या देशांमधील पिस्को या जीआय टॅग वरील वादात संतुलनाचा निर्णय घेत दोन्ही देशांना समाधानकारक न्याय दिला आहे. हा निर्णय केवळ ‘पिस्को’ या जीआय वादापुरता मर्यादित न राहता, भारतामधील जीआय कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.



Powered By Sangraha 9.0