तिरुवनंतपुरम(JSK: Janaki v Kerala): भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांची मुख्य भूमिका असलेल्या मल्याळम चित्रपट ‘JSK: जानकी विरुद्ध केरळ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर वादाचे सावट आले होते. केरळ उच्च न्यायालयासमोर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन किंवा सेन्सार बोर्ड (CBFC) ने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला होता. मात्र आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी सेन्सार बोर्डाच्या मागण्या उच्च न्यायालयासमोर बुधवार, दि. ९ जुलै रोजी मान्य केल्या असून लवकरच चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
सेन्सार बोर्डाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला की, “चित्रपटात शीर्षकात ‘जानकी विरुद्ध केरळ’ हे नाव बदलून ‘जानकी व्ही’ किंवा ‘व्ही जानकी’ करावे. जानकी हे नाव देवी सीतेच्या नावाशी संबधित असल्यामुळे धार्मिक भावना दुखावू शकतात. चित्रपटात जानकी या पात्राला कोर्टात अश्लील आणि खासगी प्रश्न विचारले जातात. ती अश्लील चित्रपट पाहते का?, ती गर्भवती होती का? इत्यादी. अशा प्रश्नांचा सीता मातेच्या नावाशी संबंध असल्यास सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.” अशा प्रकारे सेन्सार बोर्डाने आपले मत केले होते.
सेन्सार बोर्डाने न्यायासयासमोर खंत व्यक्त केली की, “जर अशा चित्रपटांना परवानगी दिली, तर इतर निर्मातेही पुढे धार्मिक नावे वापरून वादग्रस्त विषयावर चित्रपट करतील. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल. सेन्सार बोर्डाने मूळतः ९६ बदल सुचविले होते. मात्र सेन्सार बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्याच्या वादविवादानंतर त्यात अखेर दोनच बदल करावेत यावर एकमत झाले होते. यासंदर्भात केरळ उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सेन्सार बोर्डाने केवळ दोन बदलांची अधिकृत मागणी केल्याचे स्पष्ट केले.
याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने सेन्सार बोर्डाला बदल स्वीकारल्यानंतर तीन दिवसांच्या आत प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. सेन्सार बोर्डाच्या मागणीनुसार, चित्रपट निर्मात्यांनी ते बदल स्वीकारले असून चित्रपटाला लवकरच प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे.