मुंबई : शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी बहुप्रतिक्षित महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक गुरुवार, १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "लोकशाही पद्धतीने हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. यावर जनतेकडूनही १२ हजार सूचना आल्या होत्या. आपल्याला माहिती आहे की, देशात मागील काळात काही राज्य ही नक्षलग्रस्त किंवा माओवाद्यांनी किंवा ज्याला आता कडवी डावी विचारसरणी असे म्हटले जाते, अशाप्रकारच्या विचाराने प्रेरित होवून अनेक लोक हे सुरुवातीच्या काळात बंदुका हाती घेऊन व्यवस्थेच्या विरुद्ध लढा. भारतीय संविधानाने जी व्यवस्था उभी केली आहे, ती आम्हाला मान्य नाही, म्हणून आमचा हा लढा आहे. आम्हाला साम्यवादी व्यवस्था उभी करायची आहे. अशा प्रकारच्या विचारातून या संघटना तयार झाल्या."
माओवाद हळूहळू संपुष्टात येतोय!
"गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार, वेगवेगळी राज्य सरकारे या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्यानंतर आता हा माओवाद हळूहळू संपुष्टाकडे येत आहे. महाराष्ट्र हे त्याचे उदाहरण आहे. महाराष्ट्रात पूर्वी चार जिल्हे माओवादग्रस्त होते. आता केवळ दोन तालुक्यात आपल्याला सक्रीय माओवाद दिसतो आहे. पुढच्या वर्षभरात तोसुद्धा माओवाद राहणार नाही, अशी अवस्था आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.