भोंदूबाबांविरोधात धामी सरकारचे 'ऑपरेशन कलानेमी' श्रद्धेच्या नावाखाली ढोंगीपणा करणाऱ्यांना थारा नाही

10 Jul 2025 16:24:20

मुंबई 
: साधू-संतांचा वेश परिधान करून लोकांना फसवणाऱ्या भोंदूबाबांविरोधात उत्तराखंड सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यासंदर्भात होणाऱ्या कारवाईला 'ऑपरेशन कलानेमी' असे नाव दिले असून, लवकरच ती प्रत्यक्षात आम्लात आणली जाणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. श्रद्धेच्या नावाखाली ढोंगीपणा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा स्पष्ट आदेश मुख्यमंत्री धामी यांनी दिलाय.

'ऑपरेशन कलानेमी' विषयी समाज माध्यमांवर माहिती देत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, देवभूमी उत्तराखंडमध्ये सनातन धर्माच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या आणि त्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या बनावट व्यक्तींविरुद्ध 'ऑपरेशन कलानेमी' सुरू करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत जिथे समाजकंटक संत आणि ऋषी असल्याचे भासवून लोकांना, विशेषतः महिलांना फसवतायत. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत तर सामाजिक सौहार्द आणि सनातन परंपरेची प्रतिमाही खराब होत आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही धर्माचा व्यक्ती असे कृत्य करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

पुढे ते म्हणाले, ज्याप्रमाणे कलानेमी राक्षसाने स्वतः संतांचा वेष परिधान करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचप्रमाणे आज समाजात अनेक कलानेमी सक्रिय आहेत, जे धार्मिक वेषात गुन्हे करत आहेत. उत्तराखंड सरकार जनभावना, सनातन संस्कृतीची प्रतिष्ठा आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. श्रद्धेच्या नावाखाली ढोंगीपणा करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही.

Powered By Sangraha 9.0