मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपाहारगृह, भूमी खरेदी प्रकरणी विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. यानंतर त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.
याविषयी मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आयकर विभाग असेल किंवा इतर विभाग असतील हे त्यांचे काम करत आहेत. त्यात काही गैर नाही. वर्ष २०१९ आणि २०२४ मध्ये संपत्तीमध्ये झालेली वाढ यावर स्पष्टीकरण मागितले आहे, ते त्यांचे काम करत आहेत. काही लोकांना वाटते की, राजकीय पुढार्यांवर काही कारवाई होत नाही, असे काही नाही. आयकर विभागाने त्यांचे काम करत मला नोटीस दिली असून मी त्याला उत्तर देणार आहे. काही लोकांनी माझ्या विरोधात आयकर विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद विभागाने घेत मला नोटीस पाठवली आहे. आयोगाने उत्तर देण्यासाठी ९ जुलैची मुदत दिली होती; पण आम्ही वेळ वाढवून मागितला आहे.