सिंदूर' उड्डाणपुलामुळे कर्नाकच्या काळ्या इतिहासाची पाने पुसली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'सिंदूर' उड्डाणपुलाचे लोकार्पण

10 Jul 2025 12:31:59


मुंबई : 'सिंदूर' उड्डाणपुलामुळे कर्नाकच्या काळ्या इतिहासाची पाने पुसली गेली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांच्या हस्ते 'सिंदूर' उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले. यावेळी ते बोलत होते.


यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र म्हणाले की, "मुंबई महापालिकेने अतिशय कमी वेळात या पुलाचे उत्कृष बांधकाम केले. रेल्वेवरचा आणि दाटीवाटीच्या भागात असलेला हा पूल असल्याने त्यात अनेक अडचणी होत्या. तरीसुद्धा टाइमलाईनच्या आत या पुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्यासह या पुलावर काम करणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन करतो. अनेक वर्ष या पुलाला आपण कर्नाकब्रीज म्हणून ओळखत होतो. कर्नाक या इंग्रजी गव्हर्नरच्या नावाने हा पूल होता. स्वकीयांवर अत्याचार करणारा असा या कर्नाकचा इतिहास होता. त्यामुळे त्याच्या काळ्या इतिहासाची पाने पुसली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून या पुलाचे नाव बदलण्यात आले."


"भारतीय सेनेने अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानमध्ये जाऊन जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे ते दाखवून दिले. त्यामुळे या पुलाचे नाव ऑपरेशन सिंदूरच्या नावाने सिंदुर असे करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तसे पत्र महापालिकेला दिले होते. जवळपास ३२७ मीटरचा हा पूल असून त्यातील ७० मीटरचे काम रेल्वेवर करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीकरिता हा पूल उपयुक्त असेल. हा पूल मुंबईकरांना समर्पित झाला असून ३ वाजतापासून तो वाहतुकीसाठी खुला होईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.




Powered By Sangraha 9.0