राज ठाकरे सोबत आल्यानंतर इंडी आघाडीला उबाठाने लावला सुरुंग!

10 Jul 2025 15:42:13


मुंबई : ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात असतानाच आता संजय राऊतांनी इंडी आघाडी आणि मविआ संदर्भात सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आले आहे.


संजय राऊत म्हणाले की, "इंडिया आघाडीचे भविष्य काय? असे लोक विचारतात. जेव्हा राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे मंचावर गेले आणि महाराष्ट्रात एक प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला की, यापुढे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे भविष्य काय? इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली होती. आम्ही एकत्र निवडणुका लढल्या, आम्हाला चांगले यश मिळाले. पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही. अशी खंत स्वतः उद्धव ठाकरे यांनीसुद्धा अनेक नेत्यांसमोर व्यक्त केली. इंडिया आघाडीचा विषय हा राष्ट्रीय विषयांवर आहे. महाविकास आघाडीत प्रामुख्याने तीन पक्ष होते. ही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झालेली एक आघाडी आहे. आम्ही निवडणुका लढलो. आजही महाविकास आघाडी आहे. आम्ही आजही त्याचे घटक आहोत. आजही महाविकास आघाडी संदर्भात निर्णय एकत्र घेतले जातात," असे ते म्हणाले.


आमच्यावर जनतेचा दबाव!


"महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढतील का? असा प्रश्न आजही लोकांच्या मनात आहे. पण त्यासाठी त्यांची स्थापना नाही. स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत यासाठी वेगळी गणिते आणि समीकरणे असतात. त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावे लागते, तर कधी स्थानिक पातळीवर आघाड्या कराव्या लागतात. मला जेव्हा याबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा मी इतकेच सांगितले की, आमच्या सगळ्यांवर जनतेचा दबाव आहे, जो आपण ५ तारखेला पाहिलामुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र निवडणुका लढाव्या, हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होतील. त्यावर आता फार चिंता करण्याचे कारण नाही," असेही संजय राऊत म्हणाले.


Powered By Sangraha 9.0