मुंबई : मुंबई आणि महानगर परिसरामध्ये गेल्या ११ वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत प्रकल्प मार्गी लावून शहर आधुनिक व सुरक्षित करण्याचे प्रयत्न होत असताना, मुंबईचा रंग बदलण्याचे काही घटकांचे प्रयत्न आहेत. मतांच्या राजकारणासाठी या शहराचे ध्रुवीकरण करण्याचा यामागे डाव असल्याचा दावा अंधेरी पश्चिमचे भाजप आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलताना अमित साटम म्हणाले, मुंबई शहरात ५० टक्के लोक झोपडपट्टीत राहतात. उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील पूर्वी झोपडपट्टीचा पुनर्विकास करता येत नसे. पण युती शासनाने घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयामुळे उद्यानासाठी आरक्षित असलेल्या ६० टक्के क्षेत्रावर पुनर्विकास करण्यास मान्यता मिळाली. त्याच प्रकल्पामध्ये तेथे राहणाऱ्या व्यक्तींना पीएम आवास योजनेतून हक्काचे घर प्राप्त होत आहे. मुंबई संपन्न आणि सुरक्षित होत असतानाच काही घटक या शहराचा रंग बदलू इच्छित आहेत. अशा व्यक्तींच्या राजकीय प्रचारात पाकिस्तानचे झेंडे नाचवले जातात आणि बॉम्बस्फोटातील आरोपी प्रचारात सहभागी होतात. अर्बल नक्षलच्या माध्यमातून मतांच्या राजकारणासाठी मुंबई असुरक्षित करण्याचे प्रयत्न काही शक्ती करत आहेत, असा आरोप साटम यांनी केला.
शहराचा रंग बदलू इच्छिणाऱ्या घटकांना राजकीय शक्ती मिळत राहिल्यास मुंबईतील प्रत्येक रस्ता मोहम्मद अली रोड होईल. कुठलातरी खान या शहराचा महापौर होईल. या शहरात वर्सोवा किंवा मालवणी पॅटर्न तयार होवून हे सुंदर शहर बरबाद होईल. असे होऊ नये यासाठी शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी यावेळी केली.